Advertisement

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचीत खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सकाळी कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचीत खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सकाळी कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत नेमकी कुठली चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नसला, तरी राज यांचे आभार मानण्यासाठी ही भेट घेतल्याची प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली. 

राज यांनी निवडणुकीदरम्यान आपल्या मतदारसंघात येऊन घेतलेल्या प्रचारसभेबद्दल आभार मानायला आल्याचं कोल्हे यांनी स्पष्ट केलं. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आमच्यात गप्पा झाल्याचंही ते म्हणाले.

प्रचारसभांचं वादळ

लोकसभा निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाढती जवळीक सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्यासाठी शरद पवार आग्रही असले, तरी काँग्रेसच्या नकारघंटेमुळे मनसे या आघाडीत सामील होऊ शकली नाही. असं असूनही राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाही एकही उमेदवार उभा न करता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार उभे असलेल्या ठिकाणी जाऊन प्रचार केला होता. या प्रचारसभांचं प्रत्यक्ष मतांमध्ये रुपांतर झालं नसलं, तरी राज यांच्या भाषणाने सत्ताधाऱ्यांच्या नाकात दम आणला होता.  

आघाडीची चर्चा

त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नरमाईचं धोरण स्वीकारत मनसेला महाआघाडीत सामावून घेण्याची तयारी दर्शवली होती. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर तर या चर्चेला उधाण आलं होतं.

कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीत ३ वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ५८,४८३ मतांनी पराभव केला होता.



हेही वाचा-

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला?

सर्व कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारच्या अयशस्वी कामांना जनतेसमोर आणा- अजित पवार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा