जिओ (JIO)च्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी भाजप सरकार भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) या २ कंपन्यांचा बळी देत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. आर्थिक गाळात गेलेल्या या दोन्ही कंपन्या बंद करण्याचा विचार सरकार करत असल्याचं म्हटलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची संपत्ती आपले दोन्ही मित्र अदानी आणि अंबानी यांच्या हवाली करत आहेत. देशातील जनतेने सरकारचा हा डाव ओळखून त्यांना घरी बसवलं पाहिजे, असंही नवाब मलिक म्हणाले.
सद्यस्थितीत BSNL च्या डोक्यावर १४ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. आर्थिक वर्ष २०१७ -१८ मध्ये कंपनीला ३१२८७ कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. सद्यस्थितीत कंपनीत १.७६ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना व्हिआरएस देऊन कमी केलं जात आहे. त्यामुळे पुढच्या ५ वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या ७५ हजार एवढी होईल. तर MTNL मध्ये सद्यस्थितीत २२ हजार कर्मचारी आहेत आणि कंपनीवर १९ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. कंपनीच्या उत्पन्नाचा ९० टक्के हिस्सा कर्मचाऱ्यांचा पगार देण्यातच खर्च होत आहे.
डिपार्टमेंट ऑफ टेली कम्युनिकेशन्स (DOT) ने BSNL आणि MTNL ला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी ७४ हजार कोटी रुपयांच्या रिव्हायव्हल पॅकेजचा प्रस्ताव समोर ठेवला होता. हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने फेटाळून लावला.
तर दुसऱ्या बाजूला JIO चे ग्राहक सातत्याने वाढत असल्याने प्रतिस्पर्धी कंपन्या बेजार झाल्या आहेत. यामुळेच विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
हेही वाचा-
बीएसएनएल, एमटीएनएलला लागणार टाळं?
फुकट काॅलचा खेळ खल्लास! जिओही आकारणार आता शुल्क