'स्व:संरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर करत वन्यजीव कायद्याचा भंग करणारे भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा', अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावात एका नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली असून त्याला मारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार वन खात्याचे कर्मचारी या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन स्वत:च्या संरक्षणासाठी असलेली बंदूक घेवून बिबट्याला मारायला बाहेर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवला आहे.
'या मंत्र्यांचा हा पहिलाच प्रताप नाही. यापूर्वीही हे मंत्री विधानसभेत बंदूक घेऊन आले होते. तर मुलांच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी बंदूक दाखवली होती आणि दुसरीकडे दारुच्या दुकानाला महिलांचं नाव देण्याचं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं होतं. आता तर चक्क बिबट्याला मारण्यासाठी ते खुलेआम बंदूक घेऊन फिरताना दिसत आहेत. त्यांनी स्व: संरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर केला असून त्यांनी वन्यजीव कायद्याचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लगेचच खटला चालवावा', अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.
दरम्यान भाजपा मंत्री गिरीश महाजनांवर सरकार कारवाई करणार नसेल तर आम्ही दिल्लीतील संबंधित नियुक्त अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचंही नवाब मलिक म्हणाले.