Advertisement

शिवसेनेची स्वबळाची नौटंकी - तटकरे


शिवसेनेची स्वबळाची नौटंकी - तटकरे
SHARES

'आतापर्यंत १०० वेळा शिवसेनेने सरकार सोडण्याची धमकी दिली आणि सरकारमध्येच राहून स्वबळाच्या घोषणाही. त्यामुळे ही सारी शिवसेनेची नौटंकी आहे,' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केल्यावर उद्धव ठाकरेंवर सुनील तटकरे यांनी निशाणा साधलाय.


'शिवसेना आणि आमच्यात फरक'

'शिवसेना लोकसभा निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचा दावा करते. निवडणुकीला दीड वर्षे बाकी असताना सत्तेत राहून हे कसं शक्य करणार आहेत?' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शिवसेनेची ही भूमिका दुटप्पीपणाची असल्याचं त्यांनी म्हटलंय. २०१४ ची निवडणूक लढताना आघाडीसाठी आवश्यक ती बैठक न झाल्याने राष्ट्रवादीने स्वबळावर लढायची घोषणा केली आणि सत्तेतून बाहेर पडलो, असे स्पष्ट करत आपल्या आणि सेनेच्या भूमिकेतली तफावत तटकरेंनी स्पष्ट केली. आत्ता शिवसेना आणि सरकार यांमध्ये जी धरसोड सुरू आहे, त्यावरून 'सरकार गेली ३ वर्ष आहे, पण अस्तित्त्वात नाही' असाही टोला त्यांनी लगावला.


भाजपमध्ये नाराजांची संख्या

भाजपमध्ये खडसे हे एकटे नाराज नाहीत, तर अशा नाराजांची संख्या खूप असल्याचं सुनील तटकरे म्हणाले. खडसे यांनी पक्षासाठी खूप काम केलं. मात्र, त्याचं फळ त्यांना मिळालं नाही, असे भरपूर कार्यकर्ते भाजपमध्ये गप्प असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


भविष्यात समविचारी पक्षांना सोबत घेणार

उद्धव ठाकरेंनी जशी स्वबळावर लढायची घोषणा केली, तशी राष्ट्रवादी करणार का? या प्रश्नावर समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही काळात राष्ट्रवादी आपल्यासोबत अनेक समविचारी पक्षांना घेऊन वाटचाल करत आहे. त्यामुळे भविष्यात समविचारी पक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा