Advertisement

मुंबईतील कोरोनाबळींची संख्या लपवली जात आहे- देवेंद्र फडणवीस

आरोग्य यंत्रणेतील गंभीर दोष असून ते त्वरीत दूर करावेत, अशी मागणी भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

मुंबईतील कोरोनाबळींची संख्या लपवली जात आहे- देवेंद्र फडणवीस
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्या वाढत चालली आहे. मुंबईत कोरोनाबळींची संख्या अजूनही दडवली जात आहे. त्याशिवाय आॅक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे केईएम आणि ट्राॅमा केअर रुग्णालयात अनेकांना प्राणास मुकावं लागलं आहे. हे आरोग्य यंत्रणेतील गंभीर दोष असून ते त्वरीत दूर करावेत, अशी मागणी भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (need transparency in corona death records in mumbai and maharashtra demands devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

आपल्या पत्रात फडणवीस म्हणतात की, महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस हालाखीत होत चालली आहे. १९ जून रोजी महाराष्ट्रातील आतापर्यंतचे सर्वाधिक ३८२७ रुग्ण आढळून आले आहेत. याचदिवशी मुंबईतील सर्वाधिक बळींची संख्या ११४ इतकी नोंदवली गेली आहे. १८ जूनपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला तर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येत ५२.१८ टक्के वाटा हा एकट्या मुंबईचा आहे. मुंबई आणि एमएमआर क्षेत्राचा विचार केला तर हा वाटा ७३.८५ टक्के इतका आहे. मुंबईतील मृत्यूदर ५.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जून महिन्यातील गेल्या १८ दिवसांचा विचार केला तर राज्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या संख्येत ४३.८६ टक्के रुग्ण या १८ दिवसांत वाढले आहेत. मुंबईत ३६.८८ टक्के रुग्ण या १८ दिवसांत वाढले आहेत. गेले ३ महिने सातत्याने कोरोना बळींची संख्या लपवली जात होती. त्याबाबत आपल्याला सूचित केल्यानंतर एकाच दिवशी राज्यातील बळींची संख्या १३२८ ने वाढली. ही एका दिवसाची वाढ विचारात घेतली नाही, तरी नवीन बळींच्या संख्येत जूनच्या या १८ दिवसांत महाराष्ट्रात ३६.१६ टक्क्यांची वाढ झाली असून मुंबईत ती वाढ ३५.१६ टक्के इतकी आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

हेही वाचा - शंभराव्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेचं मुंबईत लोकार्पण

एकीकडे ही परिस्थिती असताना अजूनही मुंबईत कोरोनाबळींची संख्या दडवली जात असल्याचं सातत्याने मी आपल्या निदर्शनास आणून दिलं आहे. आता तर उदाहरणासह या बाबी उजेडात येत आहेत. याबाबत अतिशय पारदर्शकपणे आकडेवारी राज्यातील जनतेसमोर मांडली पाहिजे. आपण म्हणता त्याप्रमाणे हे युद्ध किंवा लढाई कोरोनाविरूद्ध असली पाहिजे, आकडेवारीविरुद्ध नाही. मुंबई महापालिकेतील आकडेवारीबाबत तातडीने लक्ष घालून मुंबईतील स्पष्ट आणि पारदर्शी माहिती जनतेसमोर आणली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

त्याचप्रमाणे मुंबईतील केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सुमारे १० रुग्णांचा आॅक्सिजनची पातळी कमी झाल्याने मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. कोरोनाच्या काळात आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रांची निगा राखणं अतिशय आवश्यक आहे. आधीच कोरोनाचा कहर वाढत असताना त्याच मानवी चुकांमुळे बळींच्या संख्येत वाढ होणार असेल तर तो प्रकार अतिशय गंभीर आहे. यापूर्वीसुद्धा मे महिन्यात जोगेश्वरी येथील ट्राॅमा केअर रुग्णालयात १२ जणांना आॅक्सिजनच्या यंत्रणेतील बिघाडामुळे प्राणास मुकावं लागलं होतं. असे प्रकार वारंवार होणं हे आरोग्य यंत्रणेतील गंभीर दोष दाखवतात, याकडे लक्ष देऊन हे दोष दूर करावेत, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा