Advertisement

महापौरांचे कार्यालय की वृत्तवाहिनीचा स्टुडिओ?


महापौरांचे कार्यालय की वृत्तवाहिनीचा स्टुडिओ?
SHARES

मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून ओळख असणाऱ्या महापौरपदाची मान आणि प्रतिष्ठाच आता शिवसेनेकडून धुळीस मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी चक्क आपल्या दालनातच एका मराठी वृत्तवाहिनीचे चर्चासत्र भरवले. नालेसफाईच्या विषयावर महापौर दालनात भरलेल्या चर्चासत्राचे थेट प्रक्षेपण असल्यामुळे महापौरांनीही त्यात भाग घेत खुर्चीवर न बसता सर्व गटनेत्यांसह उभे राहून दिलखुलास चर्चा केली. त्यामुळे महापौरांच्या दालनातच एका वृत्तवाहिनीमुळे महापौरांना तब्बल एक तासाहून अधिक वेळ उभे राहावे लागले असून, हे महापौरांचे कार्यालय आहे की वृत्तवाहिनीचा स्टुडिओ? असा समज महापौरांना भेटायला आलेल्या नागरिकांचा झाला होता.

मुंबईतील नालेसफाईच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप असतानाच तसेच सफाईची डेडलाईन पार झाल्यामुळे मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने महापालिका मुख्यालयातील महापौरांच्या दालनातच चर्चासत्र आयोजित केले. थेट प्रक्षेपण असलेल्या या चर्चासत्रात महापौर विश्वनाथ महाडेश्वर, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, सपाचे गटनेते रईस शेख आणि मनसेचे गटनेते दिलीप लांडे आदींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. महापौरांच्या कार्यालयातील सर्व खुर्च्या आणि सर्व साहित्य बाजूला काढून या चर्चासत्राला जागा उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 

महापौर असल्यामुळे सभागृहनेते यशवंत जाधव आणि स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावरकर हेही निघून गेले. महापौर हे शिवसेनेच्या वतीने असल्यामुळे आमची गरज नाही, असे सांगत हे दोघे तिथून गेले. परंतु महापौरांच्या कार्यालयात अशा प्रकारचे वृत्तवाहिन्याच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्याची ही पहिलीच घटना असून, महापौरांनी अशा प्रकारे दालन उपलब्ध करून देत या पदाची मानमर्यादा संपवण्याचा विडा उचलला असल्याचे दिसून येते. दुपारी 3 वाजल्यापासून प्रथम गटनेत्यांची सभा आणि त्यानंतर चर्चासत्र यामुळे संध्याकाळचे साडेसहा वाजले तरी महापौरांना भेटण्यास आलेल्या लोकांना ताटकळत बाहेर उभे रहावे लागले होते.

महापौर हे या मुंबईचे प्रथम नागरिक आहेत. त्यांच्या दालनात एका वाहिनीने चर्चासत्र आयोजित करणे हे राजशिष्टाचाराला धरुन नाही. महापौरांच्या दालनात आणि महापौर हे त्या खुर्चीवर न बसता उभे राहून इतर गटनेत्यांसमवेत बोलणार हेही कोणत्याही राजशिष्टाचारात बसत नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपल्या दालनात लाइव्ह चर्चासत्र सुरू करण्यापूर्वी महापौरांनी राजशिष्टाचार जाणून घेतला असता, तर कदाचित त्यांनी नक्कीच दुसरी जागा सुचवली असती. परंतु 'हम करे सो कायदा' अशीच काहीशी महापौरांची भावना आहे. त्यातूनच त्यांनी हा निर्णय घेत राजशिष्टाचाराची ऐशी की तैशी करून टाकली. 

- मनोज कोटक, गटनेते, भाजप

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आपल्याला वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने नालेसफाईच्या विषयावर लाइव्ह चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही त्यांना होकार कळवला. परंतु ठिकाण सांगितले नव्हते. पण जेव्हा महापौरांच्या दालनात ही लाईव्ह चर्चा होणार असल्याचे कळाले तेव्हा आपण विचारणा केली. तेव्हा त्यांनी महापौरांनीच संमती दिल्याचे सांगितले. म्हणून आपण या चर्चेत त्याठिकाणी भाग घेतल्याचे राजा यांनी सांगितले. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा