पालिका रणात ‘राणेपुत्र’

दादर - जिवाभावाचे लोक साथ सोडून जातात, तेव्हा व्यथित व्हायला होतं, या शब्दांत काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी ‘मुंबई लाइव्ह’च्या टीमशी गप्पा मारताना आपल्या भावना व्यक्त केल्या. राणे कुटुंबिय लहानसहान धक्क्यांनी ढेपाळणा-यांपैकी नाही, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. 2014 साली लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानं बरंच शिकवल्याची कबुलीही त्यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेत गेली अनेक वर्ष सत्ता उपभोगणा-या शिवसेनेनं भूमिपुत्रांच्या हितासाठी काहीही काम केलेलं नाही. उद्धव ठाकरे यांना राजकारणातलं काही कळत नाही, टक्क्यांचं गणित मात्र कळतं. आदित्य ठाकरे माझ्यासमोर लहान बाळ आहे, अशी टिपीकल राणे शैलीतली बोचरी टीकाही निलेश राणे यांनी केली. मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता आल्यास प्रसंगी स्वपक्षातल्या भ्रष्ट नगरसेवकांच्या कॉलरला हात घालण्याचं आक्रमक विधानही त्यांनी ‘मुंबई लाइव्ह’ टीमशी गप्पांच्या ओघात केलं. ‘उंगली उठाओ’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निलेश राणे ‘मुंबई लाइव्ह’च्या कार्यालयात आले होते.

Loading Comments