मुंबईच्या विद्यमान नगरसेवकांना 8 मार्चला महापालिकेत प्रवेशबंदी

  CST
  मुंबईच्या विद्यमान नगरसेवकांना 8 मार्चला महापालिकेत प्रवेशबंदी
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईच्या महापौरपदाची निवडणुकीवरून गोंधळ सुरू असून ही निवडणूक 9 ऐवजी 8 मार्चला घेण्याचे जाहीर करण्यात आहे. परंतु 8 मार्चला महापौरपदाची निवडणूक झाल्यास विद्यमान नगरसेवकही सभागृहात येवून बसण्याची शक्यता लक्षात घेता विद्यमान नगरसेवकांना 8 मार्चला महापालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी सुरक्षा विभागाला निर्देश देत विद्यमान नगरसेवकांना सभागृहाच्या परिसरात प्रवेश देवू नये,अशा सूचना केल्या आहेत.

  मुंबई महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत ही 8 मार्च 2017पर्यंत असून नव्याने आलेल्या नगरसेवकांची मुदत ही 9 मार्चपासून सुरू आहे. त्यामुळे नव्या महापालिकेचे पहिले सभागृह हे 9 मार्च रोजी स्थापन होणार होती. परंतु ऐनवेळी त्यात बदल करून महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापौरपदाची निवडणूक 8 मार्चला घेण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे महापालिका चिटणीस विभागाने कार्यक्रम निश्चित केला आहे. परंतु महापौर निवडणूक 8 मार्चला घेतल्यास विद्यमान नगरसेवकही यात सहभागी होऊन मतदान करतील,असा इशारा दिला होता. त्यामुळे महापौर निवडणुकीच्या दिवशी विद्यमान नगरसेवकांमुळे कोणताही गोंधळ होऊ नये तसेच यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होऊ नये म्हणून विद्यमान नगरसेवकांना महापालिका प्रवेशबंदीचे फर्मान प्रशासनाने काढले आहेत.

  महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी शुक्रवारी महापालिका सुरक्षा विभागाला सूचना देवून विद्यमान नगरसेवकांना 8 मार्चला प्रवेश देण्यात येवू नये, असे सांगितले आहे. महापौर निवडणुकीच्या दिवशी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना त्यांना दिलेल्या प्रवेशपत्राच्या आधारे महापालिकेत आणि सभागृहात प्रवेश दिला जाणार असल्याचे सुत्रांकडून समजते. याव्यतिरिक्त कुणालाही महापालिकेत आणि सभागृहाच्या परिसरात प्रवेश देवू नये, असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.