Advertisement

एसी लोकल उद्घाटनाला महापौरांना निमंत्रण नाही; प्रोटोकॉलचा विसर की भाजपाची खेळी?

मुंबईची पहिली एसी लोकल उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर महापौरांना स्थानच देण्यात आले नसून कार्यक्रमापूर्वी महापौरांना केवळ फोनवरून निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

एसी लोकल उद्घाटनाला महापौरांना निमंत्रण नाही; प्रोटोकॉलचा विसर की भाजपाची खेळी?
SHARES

मुंबईतील पहिल्या वातानुकूलित लोकल उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा चक्क अवमान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर महापौरांना स्थानच देण्यात आले नसून कार्यक्रमापूर्वी महापौरांना केवळ फोनवरून निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या कार्यक्रमात भाजपाचे नेतेच भाव खावून गेल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपात मानापमान नाट्य रंगलेले पाहायला मिळणार आहे. विकास आराखड्याच्या अॅपच्या उद्घाटनाला महापौरांना टाळून त्यांचा अवमान करणाऱ्या भाजपा सरकारने आता लोकलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला महापौरांना निमंत्रण न देता पुन्हा एकदा राजशिष्टाचारांची ऐशी तैशी करून टाकली आहे.


शिवसेनेला श्रेय न देण्याची तजवीज?

मुंबईतील पहिल्या वातानुकूलित लोकल रेल्वेचे उद्घघाटन सोमवारी बोरीवली येथे पार पडले. या कार्यक्रमात पूर्णपणे भाजपाचेच वर्चस्व दिसून आले असून याचे श्रेय शिवसेनेला जाऊ नये, याची पूर्णपणे काळजी भाजपाच्या नेत्यांनी घेतली होती. या कार्यक्रमाला उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, भाई गिरकर, नगरसेविका प्रतिभा गिरकर आदी उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमाला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेनेचे खासदार, मंत्री, आमदार आदी कोणीही उपस्थित नव्हते.


महापौरांना बोलावण्याचा प्रोटोकॉल विसरले!

विशेष म्हणजे या उदघाटन कार्यक्रमासाठी मुंबईचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना कार्यक्रमाचे छापील निमंत्रणही पाठवण्यात आले नाही. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारचे कोणतेही छापील निमंत्रण आपल्याला रेल्वेकडून आले नव्हते, असे सांगितले आहे. रेल्वे प्रशासनातील एका अधिकाऱ्याने मला दूरध्वनीवर कार्यक्रमाचे आमंत्रण दिले, असे महापौरांनी सांगितले. या कार्यक्रमाला जायला मला आवडले असते. परंतु, कार्यक्रमाला सन्मानाने बोलवण्याबाबत राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) पाळला गेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हा राजशिष्टाचार न पाळल्यामुळेच मीही अन्य कार्यक्रमात व्यस्त असल्याचे कारण देत उद्घाटन कार्यक्रमाला जाण्याचे टाळले, असे महापौरांनी सांगितले.


शिवसेनेला आमंत्रण पत्रिकेच्या नावाखाली कागद!

शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे, अरविंद सावंत, गजानन किर्तीकर यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या खासदारांना आमंत्रण पत्रिका म्हणून एका कागदावर माहिती देण्यात आली होती. रेल्वे प्रशासनातल्या एका अधिकाऱ्याने दूरध्वनी केला होता. मात्र, अलिकडे भाजपाचे सरकार असल्याने त्यांच्या लोकप्रतिनिधींना प्रकल्प उद्घाटनाच्या कार्यक्रमात विशेष सन्मानाची वागणूक मिळत असल्याचे आवर्जून पहायला मिळत आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी प्रकल्पाचे सर्व श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत असल्याची खंत खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केली आहे.



हेही वाचा

मुंबईकरांनो, कन्फ्युज नका होऊ!, 'हे' आहेत एसी लोकलचे दर आणि वेळापत्रक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा