जीएसटीवर मुद्देसूद भाषणांचा दुष्काळ

 Nariman Point
जीएसटीवर मुद्देसूद भाषणांचा दुष्काळ
Nariman Point, Mumbai  -  

तीन दिवसीय विशेष अधिवेशनात सध्या जीएसटीवर चर्चा सुरु असली, तरी जीएसटीच्या विविधांगी मुद्द्यांचा उहापोह करणारे अभ्यासपूर्ण भाषण सभागृहात अद्याप कुणाकडूनही झालेले नाही. जीएसटीवर विचार मांडताना सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांकडील सदस्यांचा अभ्यास तोकडा पडत असल्याचे मत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.

या ज्येष्ठ नेत्याच्या मते, जीएसटीवर सध्या विरोधकांडकून जी भाषणे होत आहेत, ती सर्व रटाळ असून त्यात जीएसटीसोडून इतर विषयांवरच चर्चा झडत आहेत. अशीच परिस्थिती सत्ताधारी पक्षामध्येही आहे. त्यामुळे जीएसटी चर्चेतील भाषणे रटाळ होत आहेत. आतापर्यंतच्या भाषणापैकी कुठलेही भाषण मुद्देसुद नसल्याची कबुली या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिली.

विधान परिषदेमधील राष्ट्रवादी पक्षाच्या एका आमदाराच्या भाषणाचा उल्लेख करून या काँग्रेसच्या नेत्याने सांगितले की, जीएसटी सोडून बाकी सर्व मुद्द्यांवर हे आमदार बोलले. मात्र जीएसटीबद्दलचे मुद्दे त्यांना नीट मांडता आले नाही.

माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडून अपेक्षा होती की, जीएसटीवर ते तरी अभ्यासपूर्ण भाषण करतील. मात्र जयंत पाटील जीएसटीवर अभ्यासपूर्ण भाषण करण्याऐवजी रविवारी तीन तास भाजपा-शिवसेनावर निशाणा साधत राहिले.

तर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केलेल्या छोटेखानी भाषणात जयंत पाटील यांच्यावर टीका केली. जयंत पाटील यांचे भाषण म्हणजे हास्यकलाकार कपिल शर्मा याला धडकी बसेल असे होते. जयंत पाटील यांचे भाषण ऐकूण कपिल शर्मा यांचा कार्यक्रम बंद होईल आणि जयंत पाटील यांचा नवीन कार्यक्रम जयंत पाटील कॉमेडी शो सुरु होईल की काय? असे वाटते. जयंत पाटील यांनी कटप्पाने बाहुबली को क्यो मारा? हे जाणून घेण्यासाठी आयनॉक्स सिनेमागृहात जाऊन बसायला पाहिजे होते.

Loading Comments