एका बाजूला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून (bjp) होत असताना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने ही मागणी पुन्हा एकदा बाजूला सारल्याचं दिसून आलं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद तालिका सभापतींची नियुक्ती करण्यात आली.
विधानसभा सदस्य भास्कर जाधव, दिलीप बनकर, कालिदास कोळंबकर आणि कुमारी प्रणिती शिंदे यांची विधान सभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी या सदस्यांची निवड विधानसभेत जाहीर केली.
पावसाळी अधिवेशनासाठी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य डॉ.रणजित पाटील, डॉ.मनीषा कायंदे, अरुण लाड आणि डॉ. वजाहत मिर्झा यांची नियुक्ती केली.
हेही वाचा- विधिमंडळ पावसाळी अधिवेशन – २०२१ : प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर चालू वर्षांत मार्चमध्ये झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभा अध्यक्षांविना पार पडलं होतं. यापाठोपाठ पावसाळी अधिवेशनही उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. विधानसभा अध्यक्षांविना होणारं राज्य विधिमंडळाच्या इतिहासातील हे तिसरे अधिवेशन असेल. १९८० मध्ये शिवराज पाटील यांच्या राजीनाम्यानंतर हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडलं होतं.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी याच अधिवेशनात निवडणूक घेण्याची काँग्रेसची देखील आग्रही मागणी होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही अध्यक्षांची निवडणूक घेण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (congress) यांना पत्र लिहून केली होती. तरीही या अधिवेशनात अध्यक्षांची निवडणूक न घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीने पुन्हा काँग्रेसची कोंडी केल्याचं म्हटलं जात आहे.
(no vidhan sabha president election in monsoon session of maharashtra legislative assembly)