Advertisement

मंदिर, मशिदींसोबत बुद्धविहारही सुरू करा, ‘या’ नेत्याचं राज्यपालांना पत्र

राज्यातील मंदिर, मशिद, बुद्धविहार आणि इतर सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरू करावीत, अशा मागणीचं निवेदन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

मंदिर, मशिदींसोबत बुद्धविहारही सुरू करा, ‘या’ नेत्याचं राज्यपालांना पत्र
SHARES

राज्यातील मंदिर, मशिद, बुद्धविहार आणि इतर सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरू करावीत, अशा मागणीचं निवेदन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. (open all places of worship in maharashtra demands union social justice state minister ramdas athawale)

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ) च्या अल्पसंख्यांक आघाडीचे, मुंबई अध्यक्ष हसन शेख आणि अनिस पठाण यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने रामदास आठवले यांना निवेदन देऊन मशिद सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावर सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याबाबत आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठवू असं आश्वासन रामदास आठवले यांनी त्यांनी दिलं होतं. 

त्यानुसार पाठवलेल्या पत्रात रामदास आठवले यांनी म्हटलं आहे की, मंदिर, मस्जिद, चर्च गुरुद्वारा, बुद्धविहार, देरासर अशी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यात यावीत. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यात सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे सुरू व्हावीत, यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना केली.

हेही वाचा - २ सप्टेंबरपासून मशिदी उघडणारच, इम्तियाज जलिल यांचं ठाकरे सरकारला आव्हान

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सर्वसामान्यांसाठी मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यातच आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी राज्य सरकार माॅलपासून बाजारपेठा ते इतर उद्योगधंद्यांना अटी-शर्थींच्या आधारे परवानगी देत असताना प्रार्थना स्थळं उघडण्यास परवानगी का नाही? असा प्रश्न सातत्याने भाविकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

याच प्रश्नावर राज्य सरकारला धारेवर धरत सर्वोच्च न्यायालयाने जैन धर्मियांच्या पर्युषण काळात मुंबईतील ३ मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. हाच धागा पकडत पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर वारकऱ्यांसाठी उघडण्यात यावं अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १ लाख वारकऱ्यांचं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वारकऱ्यांकडून सरकारला देण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील काही पुजाऱ्यांनी मंदिरं खुली करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत राज ठाकरे यांनी राज्यातील माॅल सुरू होऊ शकतात, तर मंदिरं का नाही? असा सवाल सरकारला केला होता. कोरोनासंदर्भातील सुरक्षा नियमांचं पालन करुन प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी देण्यात यावी, असा सल्लाही त्यांनी दिला होता.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा