Advertisement

विधानसभा अध्यक्षांवरच 'अविश्वास प्रस्ताव'


विधानसभा अध्यक्षांवरच 'अविश्वास प्रस्ताव'
SHARES

अधिवेशनात सरकरकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्यास विरोधकांकडून कामकाज बंद पाडण्यात येतं. मात्र सत्ताधारी पक्षाकडूनच कामकाज बंद पाडण्याचा अनुभव यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येत आहे. विधानसभेत अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडून नियमानुसार कामकाज करण्यात येत नसल्याच्या मुद्यावर विरोधी बाकावरील सदस्यांशी सातत्याने खडाजंगी होत आहे. त्यामुळे अध्यक्ष बागडे यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात विधानसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.

विधान भवनातील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.


अभिनंदन ठरावावर अाक्षेप

अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात राज्यपालांचं अभिभाषण झालं. नियमानुसार सभागृहात राज्यपालांच्या भाषणावर चर्चा होऊन विरोधकांनी सुचविलेल्या सूचनांचा समावेश केला जातो. त्याला मुख्यमंत्री उत्तर देतात. मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकरवी घातलेल्या गोंधळातच पुरवणी मागण्यावरील चर्चा आणि अभिभाषणाच्या अभिनंदनाचा ठराव बागडे यांनी घेतला. यावर विरोधकांनी आक्षेप नोंदवला.


लोकशाहीचा खून

धनंजय मुंडे आणि प्रशांत परिचारक यांच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभागृहाचं कामकाज रोखून धरलं. त्यामुळे अध्यक्ष बागडे यांनी मागील कामकाज पटलावर घेतलं नाही. विरोधी पक्षातील सदस्य कामकाज नियमानुसार व्हावं यासाठी वारंवार 'वेल'मध्ये येऊन अध्यक्षांचं लक्ष वेधत होते. मात्र अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. अशा पद्दतीने कामकाज करणं हा लोकशाहीचा खून आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.


चर्चा होऊ न देण्याचा चंग

गोंधळातच राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा मंजूर करणं, पुरवणी मागण्यांवर चर्चा न करताच त्या देखील मंजूर करणं यासह शेतकऱ्यांचे प्रश्न, गृह विभाग, महसूल विभागासारख्या महत्वाच्या विभागांवरील चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र त्यावर चर्चाच होऊ द्यायची नाही, असा चंग बागडे यांनी बांधल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा