पनवेलमध्ये भाजपाचं 'कमळ', तर भिवंडीत काँग्रसचा 'हात' भारी

 Mumbai
पनवेलमध्ये भाजपाचं 'कमळ', तर भिवंडीत काँग्रसचा 'हात' भारी

सगळ्यांचेच लक्ष लागलेले पनवेल, भिवंडी महानगर पालिका निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. पनवेलमध्ये भाजपाचे 'कमळ' फुलले, तर भिवंडीमध्ये काँग्रेसचा 'हात' भाजपावर भारी पडला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगर पालिकेमध्ये स्वबळावर लढलेल्या भाजपाला चांगलं यश मिळालं आहे.भाजपाने एकूण 78 पैकी 51 जागांवर विजय मिळवत बहुमताचा 40 चा आकडा सहज पार केला आहे. तर दुसरीकडे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीला केवळ 27 जागांपर्यंतच मजल मारता आली. तर शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीला एकही जागा मिळाली नाही. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. यावेळी 78 जागांसाठी 20 प्रभागांतून उमेदवार निवडण्यात आले.

तर दुसरीकडे भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेसनं 47 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. दरम्यान, भिवंडी मनपा निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस पहायला मिळाली. या निवडणुकीत सत्ता राखण्याचं काँग्रेससमोर आव्हान होतं. उत्तर प्रदेशसह इतर राज्यांच्या  निवडणुकीत काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराची जादू काही चालली नव्हती. मात्र भिवंडीत न्यायालयीन खटल्याच्या निमित्ताने भिवंडीत आलेल्या राहुल गांधी यांच्या भाषणाचा फायदा काँग्रेसला निवडणुकीत झाला असे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

निकाल पुढील प्रमाणे -

पनवेल महानगर पालिका -
भाजपा - 51
शेकाप - 23
शिवसेना- 0
काँग्रेस - 2
राष्ट्रवादी -2
मनसे - 0

भिवंडी महानगर पालिका -
शिवसेना - 12
काँग्रेस - 47
भाजपा - 19
रिपाइं - 4
कोणार्क - 4
सपा - 2
अपक्ष - 2

Loading Comments