राज ठाकरे यांना शाखाभेटीचा मुहूर्त सापडेना!

  Mumbai
  राज ठाकरे यांना शाखाभेटीचा मुहूर्त सापडेना!
  मुंबई  -  

  पक्ष कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अजूनही चांगला मुहूर्त शोधत आहेत. 'आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, पण आता मी तुम्हाला भेटायला येईन', असे म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळवल्या खऱ्या. परंतु कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी त्यांना अद्यापही वेळ मिळालेला नाही. त्यामुळे राज ठाकरे आपल्याच शाखांचा पत्ता विसरलेत की काय? अशा प्रतिक्रियाही कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहेत.

  महापालिका निवडणूक निकालानंतर मनसेच्या अकराव्या वर्धापनदिन सोहळ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत प्रथमच संवाद साधताना 'आता मी तुम्हाला भेटायला येईन', असे आश्वासन राज यांनी दिले होते. परंतु वर्धापनदिन उलटून तीन महिने झाले तरी राज यांचे पाय मनसेच्या गडांना लागलेले नाहीत. सुरुवातीला त्यांनी दक्षिण मुंबईतील काही शाखांना भेट देण्याचा प्रयत्न केला खरा. पण त्यांचा हा प्रयत्न तोकडाच पडला. राज यांची गाडी या शाखांच्या पुढे न सरकल्याने साहेबांना आमच्या शाखांचे पत्ते सापडत नाहीत की काय? अशी चर्चा मनसेचे कार्यकर्ते करू लागले आहेत.

  महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मनसे कार्यकर्त्यांना अालेले नैराश्य, मरगळ दूर करण्यासाठी पक्षाच्या वतीने कुठलीही पावले उचलण्यात आली नाही. परंतु वर्धापनदिनाच्या भाषणात राज ठाकरे यांनी भावनिक आवाहन केल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्फुरण चढले होते. मात्र पक्ष बळकटीसाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी राज यांनी पुन्हा जुनाच बाणा अवलंबल्यामुळे आता आपल्या पक्षाचे काही खरे नाही, असे कार्यकर्त्यांचे मत होऊ लागले आहे.

  राज ठाकरे गेले काही महिने त्यांचे पुत्र अमित याच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे चिंतेत आहेत. पक्षाध्यक्षापेक्षा पित्याच्या भूमिका निभावणा-या राज ठाकरे यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये स्वाभाविक आस्था आणि आपुलकी आहे. पण गेल्या काही दिवसांत सार्वजनिक कार्यक्रम, फिल्मी पार्टीत जाणा-या मनसे अध्यक्षांना आपल्या कार्यकर्ते, पदाधिका-यांना भेटण्याचा वेळ मिळू नये, ही मनसैनिकांना अस्वस्थ करणारी बाब ठरतेय. कार्यकर्त्यांच्या मते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना भेटतात, शाखांना भेटी देतात. पण आमचे साहेब शाखांना भेटी द्यायचे तर सोडाच, साधे आम्हाला भेटतही नाही. राज यांच्या याच स्वभावामुळे महापालिका निवडणुकीत मतदारांनी आपल्याला पाठ दाखवल्याचेही कार्यकर्ते बोलू लागले आहेत. येत्या बुधवारी राज यांचा वाढदिवस असून या दिवशीही कार्यकर्त्यांना ते केवळ तीनच तास भेटणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना मोजकीच वेळ देण्याच्या त्यांच्या भूमिकेवरूनही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

  राज ठाकरे वाढदिवस साजरा करणार
  येत्या बुधवारी 14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असून कार्यकर्त्यांच्या व चाहत्यांच्या आग्रहास्तव हा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या बुधवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेतच मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा राज ठाकरे स्वीकारतील, अशी माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.