Advertisement

महाराष्ट्राचंही वादळाने नुकसान, मग पंतप्रधानचा दौरा गुजरातलाच का?- नवाब मलिक

महाराष्ट्रातही तौंते वादळाने नुकसान झालं आहे, मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राचंही वादळाने नुकसान, मग पंतप्रधानचा दौरा गुजरातलाच का?- नवाब मलिक
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी तौंते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरात भागाचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रातही तौंते वादळाने नुकसान झालं आहे, मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात अधिक भाष्य करताना नवाब मलिक म्हणाले की, तौंते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यानजीक जे जिल्हे आहेत, त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. असंच नुकसान दीव-दमण आणि गुजरातच्या काही भागाचं देखील झालं आहे. त्याची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई दौऱ्याच्या माध्यमातून करत आहेत. अशीच पाहणी जर त्यांनी महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त जिल्ह्यांची देखील केली असती, तर बरं झालं असतं. 

हा दौरा गोव्यापासून सुरू करून महाराष्ट्रातील किनारपट्टी, दीव-दमण, गुजरात अशी पाहणी झाली असती, तर बरं झालं असतं. परंतु पंतप्रधान केवळ दीव-दमण आणि गुजरातचा दौरा करत असल्याने महाराष्ट्राचा दौरा का नाही? असा प्रश्न येथील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा- “माझा दीड वर्षांचा अनुभव आहे, मी घरातूनच राज्य चालवतोय…”

दरम्यान, दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर दोन्हीही कोकणच्या दौऱ्याची सुरूवात करत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र घरातच बसून व्हिडिओ काॅन्फरन्सिगच्या माध्यमातून कोकणवासीयांचं आभासी सांत्वन करत असल्याची टीका महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

गोव्यापाठोपाठ महाराष्ट्रात धडक देऊन तौंते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा दिला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांसोबतच मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रहिवाशांची दैना झाली. कोकणात बागा उद्ध्वस्त झाल्या, घरांची नासधुस झाली. तर मुंबई-ठाण्यात झाडे उन्मळून पडल्याने शेकडो वाहनांचं नुकसान झालं. निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ सलग दुसऱ्या वर्षी आलेल्या तौंते चक्रीवादळाने महाराष्ट्रातील जनतेला मोठं संकटात टाकलं आहे.

(PM narendra modi must visit cyclone tauktae affected districts in maharashtra demands nawab malik)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा