Advertisement

‘राज’ की बात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्याच्या भाषणावर राजकीय विश्लेषक सचिन परब यांचं ओपिनियन...

‘राज’ की बात
SHARES

माझे निवडून आलेले खासदार दिल्लीत मोदींचे हात बळकट करतील. मोदींनी जसा गुजरातचा विकास केला तसा देशाचा विकास करावा.

- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, 2014

मोदींना पूर्वी पाठिंबा दिला याचा आज पश्र्चाताप होत आहे. गुजरातचा मला दाखवण्यात आलेला विकास हा देखील खोटा होता. प्रत्येक सभेत व्हिडिओ लावून मी भाजपला उघडे पाडणार आहे.

- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, 2019

मुंबई, पुणे, नाशिक सगळ्या शहरांची वाताहत होत आहे. मला आनंद आहे की, युपीमध्ये खरा विकास होत आहे. महाराष्ट्रातील मशिदी आणि मदरशांमध्ये काय काय प्रकार चालतात ते महाराष्ट्रातील पोलिसांना विचारा. ठाकरे सरकारने मशिदींवरील भोंगे बंद केले नाहीत तर आम्ही प्रत्येक मशिदीबाहेर भोंग्यांपेक्षा मोठे स्पीकर उभे करून हनुमान चालीसा लावणार आहोत.

- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, 2022

परिवर्तनवादी राज

“जो कल था वो आज नहीं है और जो आज है वह कल नहीं रहेगा। परिवर्तन संसार का नियम है।“

परिवर्तनाची व्याख्या खरी करण्याचा जणू चंग मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांधला आहे. उपरोक्तपैकी सर्वात शेवटचं विधान २ एप्रिल, २०२२ रोजीचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘गुढीपाडवा’ मेळाव्यातलं. राजकारणात काहीही कायमस्वरुपी नसतं, हे त्रिवार सत्य आहे. पण जाहीर सभांमध्ये परस्परविरोधी विधानांची जी साखळी राज ठाकरे यांनी तयार केली आहे, तिच्यावरुन चर्चा तर होणारच. किंबहुना (हा ओघात आलेला किंबहुना आहे, बरं का. कुणाच्या वक्तव्याशी साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.) कुणाला पटो न पटो. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचं स्वतःचं अस्तित्व आहे. ते बोलतात, त्याची चर्चा होतेच. त्यांच्या पक्षाचे नगरसेवक किती? आमदार किती? हे प्रश्न फोल ठरतात. राज ठाकरे यांचा स्वतंत्र चाहतावर्ग आहे. राज्याच्या राजकारणातल्या सर्वात प्रभावी वक्त्यांमध्ये त्यांचा क्रमांक खूप वरचा आहे. त्यांच्याकडे आशेने बघणारे कितीतरी जण आहेत. पण... हा ‘पण’ घात करतोय.

महाराष्ट्रात कोरोना निर्बंध हटल्यानंतर, म्हणजे प्रदीर्घ काळानंतर राज ठाकरे त्यांच्या पक्षाच्या नेता, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं ‘शिवतिर्था’वर मार्गदर्शन करत होते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ‘विजयादशमी’ मेळाव्यातलं भाषण म्हणजे शिवसैनिकांसाठी ज्याप्रमाणे ‘विचारांचं सोनं लुट्ण्याची’ संधी असे, त्याचप्रमाणे राज ठाकरे ज्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणतात त्यांच्यासाठी त्यांच्या सर्वोच्च नेत्याचं भाषण म्हणजे नवनिर्माणाच्या विचारांची गुढी उभारण्याची संधी. शिवाय राज ठाकरे यांचा आक्रमक स्वभाव, शैली माहित असणारे राजकारणी, मीडियाचंदेखील स्वाभाविकपणे राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष होतं. राज साधारण पन्नास मिनिटं बोलले आणि अपेक्षेप्रमाणे हेडलाइन्समध्ये झळकले. भाषण संपल्यानंतर सोशल मीडियावर मिम्ससुद्धा दणक्यात व्हायरल झाले. पण सूर मात्र राज यांच्यावर टिका करण्याचा होता.

भाजपा पुरस्कृत मनसे?

 राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातल्या भाषणाबद्दल बरंच बोललं, लिहिलं गेलं. त्यात भर घालावीशी वाटत नाही. म्हणून इथे  त्यांच्या समग्र भाषणाचं रसग्रहण किंवा चिरफाड दोन्ही करण्याचा उद्देश नाही. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, मातांनो” अशा संबोधनाने होत असे. अलीकडे ‘मराठी’ची जागी ‘हिंदू’ ने घेतली आहे. राज उघडपणे हिंदुत्ववादी झाले आहेत. आपल्याकडे आधीपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिवसेनेचं सध्याचं हिंदुत्व हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. मग राज ठाकरे यांनी मराठीनंतर आता हिंदुत्वाची कास का बरं धरली असावी? काही जण ही भाजपाची खेळी असल्याचं मानतात. ही शक्यता राज यांची गेल्या काही दिवसांमध्ये बदललेली भूमिका पाहता नाकारता येण्यासारखी नाही. सोशल मीडियावरच्या एका मिममध्ये राज हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विद्यमान विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांना कोणता तरी कागद दाखवत “एकदा हे स्क्रिप्ट चेक करा.” म्हणताना दिसतायत. मिममधून राज ठाकरे यांचं गुढीपाडवा मेळाव्यातलं भाषण हे भाजपाने प्रायोजित केल्याचं सुचवलं गेलंय. अख्खं भाषण ऐका. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेवर तुटून पडणारे राज ठाकरे केंद्रातल्या भाजपा सरकारच्या विरोधात  बोलताना दिसत नाहीत. नाही म्हणायला त्यांनी भाषणात त्यांना मिळालेल्या इडीच्या नोटिशीचा उल्लेख केला. मुळात ही इडीची नोटीसच राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेमागचं मह्त्त्वाचं कारण असल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे यांचं एक वैशिष्ट्य आहे. ते जिथे ज्या मुद्द्यांवर बोलणं गरजेचं आहे, तिथे त्या मुद्द्यांवर बोलतात. म्हणजे राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलताना उगीच मध्ये स्थानिक मुद्दा घुसवत नाहीत. गुढीपाडवा सभेत मात्र राज यांनी श्रोत्यांना इंग्लंड ते मुंबई महानगरपालिका व्हाया उत्तर प्रदेश आणि बेहरामपाडा अशी सैर घडवून आणली. राज महापालिकेच्या भ्रष्टाचारावर, त्यातल्या शिवसेनेच्या सहभागाबद्दल आरोप करताना उद्धव ठाकरे आणि परिवारालाही लक्ष्य केलं. अर्थात ते अपेक्षितच होतं. पण त्यांचं मुख्य लक्ष्य होतं राष्ट्रवादी काँग्रेस.

राज ठाकरे यांच्या तोंडून भाजपाचे नेता बोलत आहेत. किंवा भाजपाच्या नेत्यांना जे बोलणं जमत नाही ते राज ठाकरे आक्रमकपणे बोलतायत, असं वाटत राहिलं. राज्यातल्या महाविकास आघाडीचा सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या शिवसेनेने पक्षाची ओळख असलेल्या हिंदुत्वाशी फारकत घेतल्याचं सध्याचं चित्र आहे. या परिस्थितीत निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न मनसे करतेय आणि त्याकामात भाजपा मदत करतेय, असं मानायला पुरेपुर वाव आहे. शेवटी हे राजकारण आहे.

राष्ट्रवादीवर हल्लाबोल      

राज ठाकरे यांनी मनसे स्थापनेच्या पहिल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेची लक्तरं टांगली. भाजपाची भलामण केली. नंतर पक्षाचं चिन्ह असलेल्या रेल्वे इंजिनप्रमाणे त्यांच्या टिकेची दिशाही बदलली. ज्या भाजपाबद्दल अनेकदा गौरवोद्गार काढले, त्याच भाजपाला भाषणातून धू धू धुतला. ‘’लाव रे तो व्हिडिओ”, प्रकार याच काळातला. आता अचानक राज भाजपावर टिका करेनासे झाले आहेत. ज्या पक्षावर राज ठाकरे टिका करतात, तो त्यांच्या ‘शत्रू नंबर वन’ मानलं तर या घडीला मनसेचा ‘शत्रू नंबर १’ राष्ट्रवादी काँग्रेस असावा. ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका केली, त्यावरुन तरी असंच वाटतं. भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जातियवादी पक्ष ठरवलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टिका करण्याची त्यांची पहिलीच वेळ नाही. पण या वेळेस बात कुछ और भी है.. कोट्यवधींच्या वसुलीचे आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेता, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंध असलेले सध्या बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांना झोडण्याची संधी राज यांनी सोडली नाही.

राज्यातल्या राजकारणातला सर्वात मोठा पक्ष (भाजपा) बाहेर बसलाय. सत्तेत असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला (शिवसेना) तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) फिरवतोय, हे वास्तव त्यांनी मांडलं. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी घालण्याची विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली.

पुढे काय?

मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी सर्वात महत्त्वाचं. आता महाराष्ट्राचं नवनिर्माण सेनेचं इंजिन हिंदुत्वाच्या रुळावरुन पुढे सरकणार आहे. शिवसेनाप्रमुखांनीही ऐँशीच्या उत्तरार्धात मराठीवरुन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्षाच्या पुढच्या प्रवासाची आखणी केली होती. याबाबतीतही राज हे काका आणि राजकीय गुरु बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकतायत. ‘त्यांच्या’ मशिदींवरचे भोंगे काढून टाका. नाहीतर तुम्ही दुप्पट वेगाने समोर ‘हनुमान चालीसा’ सुरु करा, ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचीच शैली. गेले काही दिवस राज यांचा भगवी शाल पांघरलेला, शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य दाखवणारा एक फोटो तुफान व्हायरल होतोय. राज यांना बाळासाहेबांचा वैचारिक वारस ठरवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या फोनमध्ये हा फोटो वॉलपेपर म्हणून स्थानापन्न झालाय. ही कदाचित पक्षाच्या नव्या प्रवासाची वेगळी सुरुवात असू शकते.

राज ठाकरे हे करिश्माई नेता आहेत. काही नेत्यांचा अपवाद वगळता करिश्मा सदा सर्वदा टिकून राहिल्याची उदाहरणं कमी आहेत. अर्थात राज ठाकरे ही बाब जाणून आहेत. गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात हे तुम्ही कसे विसरलात? हा प्रश्न विचारत मतदारांच्या ‘शॉर्ट टर्म मेमरी’बद्दल नाराजी व्यक्त करणारे राज ठाकरे यांना त्यांच्या बदललेल्या भूमिकांबाबत मतदारांच्या याच ‘शॉर्ट टर्म मेमरी’वर भिस्त ठेवावी लागणार आहे. पण सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात त्यांच्या वेळोवेळी बदललेल्या भूमिकांची आठवण त्यांचे राजकीय विरोधक करुन देतच राहतील. लढण्यासाठी राज ठाकरे यांना सज्ज राहावं लागणार आहे.

जनतेला राज यांच्या रुपात मराठीचा कैवार घेणारा, भूमिपुत्रांसाठी लढणारा नेता दिसला. राज यांनी स्वतःची ही ओळख पुसली जाणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. राज हे विषयांची जाण असलेले, ठाऊक नसलेल्या गोष्टी शिकून घेण्यासाठी तत्पर असलेले, कलाकार, कलाप्रेमी, उत्तम वक्तृत्व असलेले, सल्लागारांच्या हो मध्ये हो न मिसळणारे नेता आहेत. आपल्यातल्या गुणांचा वापर आणि न्यूनांतून शिकण्याची वृत्ती ठेवली तर महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी मदतच होणार आहे. राज ठाकरे हे त्यासाठी तयार आहेत का, एवढाच ‘मनसे’ प्रश्न आहे.



हेही वाचा

तर मशिदीच्या समोर दुप्पट भोंगे लावून हनुमान चालिसा, राज ठाकरेंचं अल्टीमेटम

‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’ - सुजात आंबेडकर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा