Advertisement

कोरोना संकटात तरी राजकारण थांबवा

राज्यात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडं राजकीय टीका, आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत.

कोरोना संकटात तरी राजकारण थांबवा
SHARES

राजकारण हे कधी, कुणासाठी, कशासाठी खेळलं जाईल हे सांगता येत नाही. कोणत्याही कारणात राजकारण घुसडण्यात राजकारणी हुशार असतात. सध्याच्या परिस्थितीत तर हेच दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत राजकारण सो़डून नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कोरोनाला थोपवण्यात सर्व यंत्रणा प्रयत्न करत असताना अनेक राजकारणी मात्र आपली पोळी भाजून घेण्यात धन्यता मानत आहेत.


राज्यात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडं राजकीय टीका, आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात काही दिवस शाब्दिक युद्ध सुरू होतं. आपत्ती पर्यटन अशी टीका केल्यानंतर फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना ‘नया है वह’ असा उपहासात्मक टोला लगावला होता. त्यानंतर फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरे यांनीही उत्तर दिलं होतं.

 

दुसरीकडं धारावीत कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आलं आहे. मात्र, यामध्येही श्रेयाचं राजकारण सुरू झालं. धारावीतील कोरोना नियंत्रण मिळवण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि काही स्वयंसेवी संस्थेने मदत केल्याचं भाजपाच्या नितेश राणे, चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. तर यावरून श्रेयवाद करणाऱ्या भाजपावर शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी टीका केली.


धारावीतील कोरोना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि काही स्वयंसेवी संस्थेमुळे नियंत्रणात आल्याचं नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटलं होतं. त्यानंतर भाजपाचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनीही आरएसएसलाच याचे श्रेय दिले आहे. स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक सदस्याची तापमान, ऑक्सिजन, सॅच्युरेशन तपासणी केली. जे संशयास्पद वाटलं ते महानगरपालिकेला सांगितलं. त्यांनी हे काम पालिकेच्या मदतीनेच केलं. त्यामुळे सर्व श्रेय सरकारचं असण्याचं काहीच कारण नाही, असं त्यांनी म्हटलं. यावर धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती आहे, अशी टीका शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केली आहे.


स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही यामध्ये उडी घेत आरएसएसला चांगलाच टोला लगावला. धारावीतील कोरोना आरएसएसच्या स्वयंसेवकांमुळे नियंत्रणात आला असेल तर संघाचे मुख्य कार्यालय असलेल्या नागपुरात संघाचे स्वयंसेवक नाहीत का?असा सवाल शेट्टी यांनी केला.

 
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. रुग्णांच्या संख्येवरून विरोधी पक्षांनी नेहमीच सरकारवर टीका केली आहे. कोरोनाच्या चाचण्या पुरेशा होत नाहीत. रुग्णांची नेमकी संख्या आणि मृतांची आकडेवारी लपवली जाते, असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं हे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत. अशा वेळी अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने मुंबईतील कोरोना रुग्णांची खरी आणि पारदर्शक आकडेवारी प्रसिद्ध केली जात आहे, असं म्हटलं आहे. यावरूनही आता आरोप-प्रत्यारोप दिसून येत आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील ही माहिती ट्विट केली आहे. सरकारवर आरोप करणाऱ्यांना त्यांनी हे अप्रत्यक्ष उत्तरच दिलं आहे.


भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी मात्र वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या या माहितीची खिल्ली उडवली आहे. मुंबईत इतका गोंधळ असतानाही मुंबई महापालिका कोरोना रुग्णांचे खरे आकडे देते असं वॉशिंग्टन पोस्ट'ला वाटतं. वॉशिंग्टन पोस्टच्या प्रतिनिधीला मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी कशी मिळाली? ते कुणाशी बोलले की कुणाच्या फायद्यासाठी टेबल स्टोरी केली?, असा प्रश्न नीतेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मुंबईकर भयंकर त्रासातून जात असताना असं वृत्त येणं हा विनोदच आहे. मुंबई महापालिकेनं कोरोना रुग्णांचे खरे आकडे प्रसिद्ध करावेत. मग पाहूच, असं आव्हान नीतेश राणे यांनी दिलं आहे.


 महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना भाजपचे राज्यातले आणि दिल्लीतील नेते महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होईल अशी विधानं करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर असलेले विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवरटीकेची तोफ डागली आहे. आपापसात विरोधाने भरलेले सरकार लोकांच्या हिताचे नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना, ‘गिरीश, मला या दौऱ्यात कोरोना झाला तर शासकीय रुग्णालयातच दाखल करावे’, असे व्यक्तव्य केले होते. यावर 

 

देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना होऊ नये, अशी टिप्पणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे केली. राज्यात सत्ता आणणे म्हणजे बैलजोडी घेण्यासारखे आहे का? असा टोला लागावत राज्यात सत्ता आणण्याचे स्वप्नही विरोधकांनी पाहू नये, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला.


एकंदरीत, कोरोनासारख्या गंभीर संकटातही राजकारणी आपला पिंड काही सोडायला तयार नाहीत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. अशा परिस्थितीत नागरिक भितीच्या छायेखाली राहत आहेत. तर रोजगार नसल्याने अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. हे संकट जाऊन आधीसारखं पुन्हा सुरळीत होईल हे पुढील काही महिने तरी शक्य दिसत नाही. अशा कठीण परिस्थितीत राजकारण करण्यापेक्षा सर्वसामान्यांना दिलासा देणारी वक्तव्ये राजकीय नेत्यांकडून अपेक्षीत आहेत. 

 


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा