Advertisement

शिवसेना आणि भाजपाला मुंबईकरांची 'जबाबदारी' नकोशी?


SHARES

गेली अनेक वर्ष महानगरपालिकेवर सत्ता उपभोगणा-या शिवसेनेला सर्वसामान्य मुंबईकरांचा विसर पडलाय की काय?असं वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीकाळी  'मी मुंबईकर' असं कॅम्पेन चालवत शिवसेनेनं मुंबईकरांकडे मतांचा जोगवा मागितला होता. तीच शिवसेना मुंबईकर संकटात सापडल्यावर मात्र त्यांच्या मदतीला धावून येण्यात तूर्त माघार घेताना दिसतेय. शिवसेना आमदार अनिल परब यांनी नुकत्याच केलेल्या विधानावरून तरी हेच स्पष्ट होत आहे. मुंबईत पाणी भरल्यावर त्याला सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री नंतर  आयुक्त जबाबदार असतील, या दोघांनंतर शिवसेना जबाबदार असेल अशी जबाबदारी झटकणारी भूमिका घेऊन परब यांनी एकप्रकारे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या मतदारांचा अपमानच केला आहे.

नालेसफाईच्या मुद्द्यावर सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार अनिल परब यांनी आशिष शेलार यांच्या पाहणी दौऱ्यावर टीका केली आहे. आशिष शेलार ही कुठली सर्टिफाईड एजन्सी नाही आणि त्यांनी सर्टिफिकेट देण्याची गरज नसल्याचं सांगत त्यांनी शेलार यांना टार्गेट केले आहे. उद्धव ठाकरे दरवर्षी नाले सफाईचा दौरा करतात. याचवर्षी आशिष शेलार यांना उद्धव ठाकरे यांचा दौरा का खटकला? हे कळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोठ्या गर्जना करूनही मुंबई महापालिकेमध्ये सत्ता आली नाही, त्याचं  दुःख होत असेल अशी बोचरी टीकाही अनिल परब यांनी यावेळी शेलार यांच्यावर केली.

आशिष शेलार यांनी बुधवारी नालेसफाईबाबत 100 टक्के असमाधानी अाहे असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्याची खिल्ली उडवली होती. आशिष शेलार यांची टीका शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागल्याने शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. दरम्यान, अनिल परब यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी देखील जोरदार उत्तर दिलं.


हेही वाचा

का म्हणाले आशिष शेलार 'काटा लगा'?

100 टक्के नालेसफाई कधीच होऊ शकत नाही - उद्धव ठाकरे


आंब्याच्या झाडाखाली बसून काकड्या किती लागल्या आहेत? असं विचारणं अनिल परब यांचा स्वभाव असल्याची टीका शेलार यांनी केली. मुंबईतला गाळ काढला जातोय काय? हे महत्वाचे आहे. अनिल परब हे भ्रष्ट कंत्राटदारांची भाषा का बोलत आहेत? आणि त्यांची वकिली का करत आहेत? हा एक मोठा प्रश्न आहे असा सवाल शेलार यांनी उपस्थित केलाय.

नाले सफाई, रस्ते दुरुस्तीसाठी वेगळे प्राधिकरण -

आशिष शेलार आणि भाजपाचे काही नेते तसेच नगरसेवकांनी नालेसफाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली. नालेसफाईच्या कामात पारदर्शकता आणावी म्हणून आशिष शेलार यांनी काही उपायही यावेळी सुचवले आहेत. नालेसफाई, रस्ते दुरुस्तीसाठी राज्यसरकार आणि प्रमुख कंपन्यांना घेऊन एमएसआरडीसीच्या धर्तीवर 50-50 तत्वावर आणि 5 टक्के नफ्यावर प्राधिकरण बनवून त्याच्यामार्फत काम करावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. नालेसफाईवर सीसीटीव्हीने निगराणी ठेवावी, कंत्राटदारांच्या पावत्या वेळोवेळी तपासण्यात याव्यात, गाळ काढल्याची माहिती सोशल मीडियावर द्यावी, अशा मागण्या यावेळी केल्या आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा