मुलुंडमध्ये मामा विरुद्ध भाचा

 Mumbai
मुलुंडमध्ये मामा विरुद्ध भाचा
Mumbai  -  

मुलुंड - निवडणुकीच्या आखाड्यात प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सामना करताना समोर आपले आप्त, नातेवाईक ठाकले तर काय स्थिती होईल? याची कल्पनाच करवत नाही ना. पण या महापालिका निवडणुकीत चक्क मामा-भाचे निवडणुकीत उतरले आहेत. मुलुंडमधील प्रभाग 106 मधून भाजपाचे उमेदवार प्रभाकर शिंदे आणि शिवसेनेचे उमेदवार अभिजित कदम हे दोघेही मामा-भाचे आहेत. त्यामुळे ही निवडणूक दोघांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे मामा जिंकणार की भाचा की या दोघांच्या लढाईत तिसरा बाजी मारून जाणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुलुंडमधील शिवसेनेचा चेहरा असलेल्या माजी सभागृह नेता प्रभाकर शिंदे यांना पक्षाने उमेदवारी नाकारून अभिजित कदम यांना दिली. त्यामुळे एवढी वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या शिंदे यांनी राजकीय अस्तित्वासाठी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना येथील प्रभाग 106 मधून उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे अभिजित कदम आहेत.

अभिजित कदम हे शिवसंग्राम, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा असा प्रवास करत शिवसेनेत आलेले आहेत. "सहा महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्याला उमेदवारी दिली जाते आणि आपल्यासारख्याला नाही, म्हणून मी पक्ष सोडला," असे प्रभाकर शिंदे यांनी ‘मुंबई लाईव्ह’शी बोलतांना सांगितले. "अभिजित हा चुलत बहिणीचा मुलगा आहे. मागील महापालिका निवणुकीत तो राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उभा होता, तेव्हा त्याचे डिपॉझिट जप्त झाले होते. याही वेळेला ते होईल," असे प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

Loading Comments