आंबेडकर पुतळ्यावरूनही शिवसेना-भाजपात जुंपणार?

 Mumbai
आंबेडकर पुतळ्यावरूनही शिवसेना-भाजपात जुंपणार?

मुंबई - चैत्यभूमीच्या सुशोभिकरणावरून शिवसेना विरुद्ध सरकार अशा वादाला तोंड फुटलेले असतानाच आता नरिमन पॉइंटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणावरून चांगलीच जुंपणार आहे. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करून त्यावर छत्री उभारण्यात येत आहे. यासाठी सरकार आणि महापालिकेच्यावतीने निधी खर्च केला जात असून आता याच्या लोकार्पण सोहळयावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपात कलगीतुरा रंगताना पहायला मिळणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर जगातील पहिला पुतळा हा मुंबईतील नरिमन पॉइंट येथे उभारला गेला. साडेदहा फूट उंचीचा हा पुतळा आहे. मादाम कामा रोड आणि कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाच्या जंक्शनवर तसेच कुपरेजजवळ उभ्या असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पुतळ्याचे सुशोभिकरण करून त्यावर छत्री उभारली जात आहे. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेऊन महापलिकेकडून याचा खर्च जाणून घेतला. त्यानुसार यासाठी होणाऱ्या खर्चाचा 12 लाख रुपयांचा निधी जिल्हा विकास निधी समितीच्या माध्यमातून महापलिकेला मागील नोव्हेंबर महिन्यात देण्यात आला. पुतळयावरील ही छत्री बसवण्यास आणि सुशोभिकरणास पुरातन वास्तू विभागाची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा मागवून कंत्राट दिले आहे. या निविदांमध्ये 12 लाखांपेक्षा अधिक खर्च होणार आहे. त्यानुसार कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. तर 14 एप्रिलपूर्वी हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या निधीतून छत्री बसवण्यात येणार आहे. तर महापालिकेकडूनही पितळेची पुस्तकाची प्रतिकृती बनवून त्यावर इंग्रजी आणि मराठी भाषेतून जीवनपट रेखाटला जाणार आहे. शिवाय संविधानाची प्रस्ताविकाही तयार केली जाणार आहे. यासाठी आठ ते साडेआठ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या 12 लाख रुपयांबरोबरच महापालिकेच्या वतीने साडेआठ लाख रुपये खर्च केला जात आहे. त्यामुळे आता चैत्यभूमीपाठोपाठ कुपरेजजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे श्रेयही सरकार घेणार असून पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेला भाजपा धोबीपछाड देणार असल्याचे चिन्ह स्पष्ट दिसून येत आहे. सभागृह नेते यशवंत जाधव यांनी मात्र, आपल्याला याची कल्पना असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

Loading Comments