Advertisement

घसरलेला प्रचार आणि वैचारिक पातळी

वाट्टेल ते बोला आणि आपला मुद्दा रेटा, हे तत्त्व सध्या प्रचारात दिसतंय. ‘चौकीदार चोर है, हे सर्वोच्च न्यायालयानंच मान्य केलंय,’ हे राहुल गांधींचं वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडलंय आणि चक्क माफी मागून न्यायालयाच्या तावडीतून सुटावं लागलंय.

घसरलेला प्रचार आणि वैचारिक पातळी
SHARES

दर ५ वर्षांनी लोकशाहीचा कुंभमेळा भरतो तसा यंदाही भरलाय. यंदाच्या कुंभमेळ्यातही राम मंदिर, साध्वींपासून विकासापासून भ्रष्टाचारासारख्या नेहमीच्याच आरोप-प्रत्यारोपांची राळ उठतेय. पण, यावेळी काही प्रमुख नेत्यांनीच प्रचाराची पातळी नको तेवढी खाली आणली आणि चक्क मतदारांना ‘कुठे नेऊन ठेवलाय प्रचार तुमचा?’ असा प्रश्न विचारायची वेळ आणलीये.

सर्वात मुख्य म्हणजे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची जीभ घसरली आणि काय उखाडायचं ते उखाडा असं अमित शहांना म्हणण्यापर्यंतची त्यांची मजल गेली, याचंच सर्वांना आश्चर्य वाटतंय. पवारांनी कदाचित त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत ही पातळी पहिल्यांदाच गाठली. पवारांसारख्या नेत्याकडून जर जीभ सैल पडू शकते तर इतरांची काय व्यथा? त्यात भाजपाच्या बोलभांड नेत्यांना कोण आवरणार? मग ती साध्वी असो किंवा आणि कोणी!

साध्वी प्रज्ञासिंहने तर कहरच केला. इतका की शेवटी भाजपालाही अडचणीत सुटण्यासाठी जावडेकरांसारख्यांना पुढे करावं लागलं. मुंबई हल्ल्यात हुतात्मा झालेल्या एटीएस प्रमुख हेमंत करकरेंना शाप दिल्याचं त्यांचं वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. तरीही, भाजपाचे अमित शहा त्यांच्यावरील आरोप खोटे होते वगैरे सांगून पाठराखण करण्याची धडपड करत होते. थोडक्यात, भाजपाला हिंदुत्वाचे कार्डही वापरायचे आहे आणि तथाकथित सर्वसमावेशक म्हणजे सबका साथ सबका विकासचा नाराही द्यायचा आहे, हेच त्यातून दिसते.

वाट्टेल ते बोला आणि आपला मुद्दा रेटा, हे तत्त्व सध्या प्रचारात दिसतंय. ‘चौकीदार चोर है, हे सर्वोच्च न्यायालयानंच मान्य केलंय,’ हे राहुल गांधींचं वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडलंय आणि चक्क माफी मागून न्यायालयाच्या तावडीतून सुटावं लागलंय. संसदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणारे काँग्रेसचे हे युवराज आता स्वतः माफी मागूनच सुटलेत. तेव्हा, राहुलना काय म्हणायचे? आता हे जर विचारले तर काँग्रेसवासींना मिरच्या झोंबणार की नाही? खरंतर, न्यायालयीन प्रक्रियेवर बोलताना आपणही सजग असतो. त्यातच आचारसंहिता लागू असताना एका राष्ट्रीय पक्षाचा नेता असे वक्तव्य करतो, यातूनच या नेत्यांचं नैराश्य किंवा उथळपणा समोर येतो.

पंतप्रधान मोदीही जवानांच्या नावावर मतं मागताना दिसताहेत, राहुल चौकीदाराला चोर म्हणताहेत, पवार शहांना काय उखाडायची ते उखाड म्हणताहेत, सुप्रियाताई घरात शिरण्याची गोष्ट करताहेत, मनेका गांधी मुस्लिम मतदारांना थेट धमकी देताहेत, सपाचे आझम खान तर महिला उमेदवाराच्या अंतर्वस्त्राचा उच्चार करून कहरच करताहेत, फारुख अब्दुला, मेहबूबा मुफ्तींसारख्या नेत्यांना तर देशापेक्षा काश्मीरचीच चिंता जास्त असल्याने तेही वाट्टेल ते बरळताहेत... थोडक्यात काय तर देशातल्या प्रमुख पक्षांचे नेतेच वाट्टेल ते बोलू लागले तर इतर छोट्या-मोठ्या नेत्यांची काय कथा? स्थानिक पातळीवर तर बोलणाऱ्यांचे तोंड आवरायचे कसे आणि कोणी हेच कळत नाही. निवडणूक आयोगाकडे हजारोंनी येणाऱ्या तक्रारी पाहिल्या तर प्रचाराची पातळी कुठे गेलीये, हे लक्षात येईल.

सध्या रस्त्यावरच्या प्रचाराबरोबरच व्हर्च्युअल विश्वातला प्रचारही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे, सोशल मीडियावरच्या या प्रचारात नेत्यांबरोबरच आता तथाकथित अभ्यासू विचारवंत, कलाकारही बोंबलायला लागले आहेत. निवडणुका आल्या की लोकशाही धोक्यात आली म्हणून यांची किरकिर सुरू होतेच. अर्थात, हे विचारवंत असल्याने यांना कोणी काही बोलले तर तो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिक्षेप असतो, म्हणजे सोप्या भाषेत त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला असतो. अर्थात, हे वाट्टेल ते बोलणार आणि बाकीच्यांनी बोललेलं त्यांना चालणार नाही. त्या काँग्रेस उमेदवार ऊर्मिला मातोंडकरांच्या प्रचारयात्रेत बोरिवली स्टेशनवर झालेला राडा आणि त्यानंतरची सोशल मीडियावरची हमरीतुमरी याचंचं लक्षण आहे. ऊर्मिलाच्या रॅलीत मोदी मोदीच्या घोषणा देणाऱ्या स्टेशनवरच्या प्रवाशांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हे व्हिडिओत स्पष्ट दिसत होते. तरीही त्यांना भाजपाचे कार्यकर्ते ठरवून सोशल मीडियावर काँग्रेसच्या भक्तांनीही मोदीभक्तांबरोबरच आम्हीही आहोत, हे दाखवून दिले. त्यात काही तथाकथित विचारवंतही होते, जे जणू काही बोरिवली स्टेशनवर आपण उपस्थित होतो आणि आपल्यासमोरच हे घडले अशा थाटात बरळले.

दुसरं उदाहरण म्हणजे, वैचारिक कलावंतांचे. कोण ती स्वरा भास्कर की वैचारिक तस्कर, त्या कन्हैय्या कुमारच्या रॅलीत जाऊन भाषणबाजी करते, सोशल मीडियावर टिवटिव करते आणि तिला कोणी काहीही बोललं की त्यांना भाजपाचे ट्रोलर्स ठरवते. जणू काही सोशल मीडियावर दोनच जमाती आहेत, एक मोदीभक्त आणि दुसरी मोदीविरोधक. इतर कुणाला स्वतःचं मतच नाही, असा समज करून वावरणाऱ्या या विचारवंतांना आवरायचीही वेळ आलीये. कारण, या राजकीय प्रचारात या वैचारिक प्रचाराचाच अतिरेक झालाय. आणि त्यामुळेच कदाचित सोशल मीडियावरची गरळ प्रत्यक्ष प्रचारात ओकायला सुरुवात झालीये.

असो, आता २३ मे ला या सर्व घसरलेल्या प्रचाराचं पाप कुणाच्या माथी फुटणार हे कळेलच. परंतु, मतदारराजानंही हे सर्व लक्षात घेऊन आपला हक्क बजावण्याची गरज आहे. तेव्हा घसरलेल्या प्रचाराचा टक्का, मतदानाचा टक्का वाढवून सावरायची वेळ आपली आहे, हे लक्षात घ्या आणि मतदान करा! तूर्तास एवढंच!


DISCLAIMER : All views expressed in this article are personal and purely as per the author. Mumbai Live holds no opinion on the content of the article and does not promote any particular view or sentiment.



हेही वाचा  -

शिवसेनेशी जुळवून घेतलेल्या पूनम महाजन पुन्हा येतील का निवडून ?

नगरसेवक ते खासदारपदाची झेप घेतील का मनोज कोटक?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा