महापालिका निवडणुकीची तारीख आता कधीही जाहीर होऊ शकेल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मुंबई महापालिकेमध्ये सध्या शिवसेना आणि भाजपाची सत्ता आहे. 2012ची निवडणूक जिंकताना त्यांनी मुंबईकरांना एक वचननामाही दिला होता. त्या वचननाम्यातली किती वचनं पूर्ण झाली? त्यानुसार मुंबईत कामं झाली की नाहीत, झालीच तर किती झाली... याचा हा लेखाजोखा.
पाणी
- मरोशी-वाकोला-माहीम बोगद्याचे काम पूर्ण
- गुंदवली- कापूरबावडी -भांडूप कॉम्प्लेक्स काम पूर्ण
- पाइप इन पाइप आणि मायक्रोटनेलिंगचं काम सध्या सुरू
- औद्योगिक वापर, शौचालयासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पाचं वचनही दिलं होतं. मात्र ते उभारण्यात आलेलं नाही

आरोग्य
- मुंबईच्या पूर्व भागात ट्रॉमा सेंटर उभारण्याचं वचन दिलं होतं. मात्र ते पाळण्यात आलेलं नाही. जागेश्वरीला नवीन ट्रॉमा सेंटर मात्र झालं
- आशियातील सर्वात मोठं टीबी रुग्णालय असलेलं शिवडी टीबी रुग्णालय अद्ययावत करण्याचं काम सुरू
- महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये डायलेसिस सेंटर सुरू करण्याचंही वचन होतं. मात्र वचनपूर्ती नाही
- महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये डायग्नोस्टिक लॅब सुरू करण्याचं वचनही दिलं होतं. मात्र तेही पाळलेलं नाही

शिक्षण
- शिक्षण विभागाचं बजेट दरवर्षी वाढतंय. तरीही शंभरी 15 मुलं महापालिकेची शाळा सोडतायत
- मराठी शाळा वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचं वचन दिलं होतं. पण ते पूर्ण करणं शिवसेना-भाजपाला शक्य झालं नाही
- महापालिकेच्या सर्व शाळांच्या इमारतीची दुरुस्ती तीन वर्षांत पूर्ण करण्याचं वचन दिलं होतं. पण ते काम कूर्मगतीनं चाललंय
- व्हर्च्युअल क्लासरूम सुरु करण्याचं वचनही होतं. पण पालिकेच्या सर्वच शाळांमध्ये ही सुविधा नाही. विद्यार्थांना टॅबवाटप झालं खरं, पण ते भ्रष्ट्राचारासाठीच गाजलं
- वेळोवेळी मूल्यांकन करून दर्जा निदर्शक वर्गीकरण करण्याचंही वचन होतं. प्रत्यक्षात महापालिका शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालवतोच आहे

रस्ते आणि उड्डाणपूल
- जास्तीत जास्त रस्त्यांचं काँक्रिटिकरण पूर्ण करण्याचं वचन होतं. मात्र वचनपूर्ती होऊ शकलेली नाही
- रस्त्याच्या क्वॉलिटीचं ऑडिट करण्याचंही वचन होतं. रस्ता घोटाळ्याबाबत महापौरांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी करावी लागली, रस्ता घोटाळ्यामध्ये काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटकही झाली

सफाई
- सफाईच्या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचंही वचन होतं. पण त्याच पांरपारिक पद्धतीनं सफाई केली जातेय
- गोराई, कांजूरमार्ग आणि मुलुंड क्षेपणभूमीवर कचऱ्यापासून वीजनिर्मितीचं वचन दिलेलं होतं. ही वीजनिर्मिती प्रत्यक्षात सुरू झालीच नाही
- शहरातील सर्व घरगल्ल्यांच्या नूतनीकरणाचंही वचन होतं. मात्र सर्व ठिकाणी हे काम सुरू झालं नाही

मैदानं
- क्रिकेट अकादमीची स्थापना करणार, असं वचनही युतीनं दिलं होतं. मात्र तेही पूर्ण झालेलं नाही. बीएमसीच्या जागेवर एमसीएनं सचिन तेंडुलकर जिमखाना बनवलाय, पण तिथे सर्वसामान्यांना प्रवेश मिळत नाही
- व्यायामशाळा आणि जॉगिंग ट्रॅकला प्राधान्याचं आश्वासनही होतं. आदित्य ठाकरेंची ओपन जिम कल्पना बऱ्याच ठिकाणी साकारली आहे
- वीरमाता जिजाबाई उद्यान आंतराष्ट्रीय दर्जाचं करण्याचं वचन दिलं होतं. हे काम सध्या सुरू आहे
- मुंबईत पाच वर्षात जास्तीत जास्त झाडं लावण्याचं वचन वचननाम्यात होतं. मात्र त्यानुसार मुंबई हिरवीगार झालेली नाहीच