Advertisement

भाजपचा 'कोंबडी वाटप' बॅनर व्हायरल, लोकांची निराशा

मुंबईतील प्रभादेवी येथे भाजपच्या वतीने कोंबडी वाटपाचे पोस्टर लावल्याची बातमी पसरली.

भाजपचा 'कोंबडी वाटप' बॅनर व्हायरल, लोकांची निराशा
SHARES

गटारीनिमित्त मुंबईमध्ये भाजपने शनिवारी थेट कोंबड्यांच्या वाटपाचा कार्यक्रमच आयोजित केल्याचे बॅनर सगळीकडे लागले होते. कोंबडी वाटपाच्या या कार्यक्रमाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर भलतेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. 

मुंबईतील प्रभादेवी येथे भाजपच्या वतीने कोंबडी वाटपाचे पोस्टर लावल्याची बातमी पसरली. या पोस्टरवर हा कोंबडीवाटप कार्यक्रम कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून राबवला जात असल्याचे म्हटले आहे.

गटारी अमावस्या (Gatari Amavasya) निमित्त १५ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रभादेवी नाका येथे हे कोंबडी वाटप केलं जाणार असल्याचा दावा या बॅनरवर केला गेला होता. 

विशेष म्हणजे या पोस्टवर राज्यातील आघाडीच्या नेत्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो लावण्यात आला आहे. या पोस्टरच्या वरील भागामध्ये केंद्रातील आघाडीच्या भाजप नेत्यांचे तसेच राज्यातील नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, नारायण राणे, महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांच्याबरोबरच अन्य नेत्यांचे फोटो आहेत. त्या खाली ‘दीपअमावस्या गटारीनिमित्त कोंबडी वाटप’ असा मजकूर देण्यात आला आहे.

या बॅनरवर फोटो आणि नाव असलेल्या सचिन शिंदे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. कुणीतरी खोडसाळपणानं फोटांचा वापर करुन बॅनर लावल्याचं त्यांनी सांगितलं. बॅनर लावून ज्यांनी बदनामीचा प्रयत्न केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं देखील ते म्हणाले.

काही वेळानंतर हा बॅनर फाडून टाकण्यात आला. प्रभादेवीमध्ये मात्र हा बॅनर व्हायरल झाल्यानंतर गर्दी देखील झाल्याचं समोर आलं होतं.

बॅनर काढण्यात आला असला तरी सोशल मीडियावर हा बॅनर तुफान व्हायरल झाला. या बॅनरची शहानिशा करण्यासाठी व मोफत कोंबडी मिळवण्यासाठी काही लोक शनिवारी सायंकाळी सहा वाजता वरळी नाका येथे पोहोचले.

मात्र दुर्दैवाने त्यांच्या हाती कोंबडीच्या ऐवजी निराशाच आली. कोणा अज्ञात व्यक्तिने खोडसाळपणा म्हणून हा बॅनर लावल्याची, सारवासारव आत्ता भाजपच्या स्थानिक-संबंधित नेत्याकडून करण्यात येत आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा