Advertisement

वंचित बहुजन आघाडीची बिहारच्या निवडणुकीत उडी

वंचित बहुजन आघाडी प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्समध्ये (पीडीए) सहभागी होत असल्याची माहिती वंचितचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीची बिहारच्या निवडणुकीत उडी
SHARES

एआयएमआयएम पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीनेही बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्समध्ये (पीडीए) सहभागी होत असल्याची माहिती वंचितचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. (prakash ambedkar led vanchit bahujan aghadi will contest bihar assembly election 2020 with pda alliance)

या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी बिहार विधानसभा निवडणूक जन अधिकार पार्टी(लो)चे अध्यक्ष आणि प्रोग्रेसिव डेमोक्रेटिक अलायन्स(PDA) चे निमंत्रक राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्यासोबत मिळून लढणार आहे. यशवंत सिन्हा आणि कॉंग्रेसला सोबत घेण्याचा देखील प्रयत्न केला जाईल. मागच्या वेळेप्रमाणे यंदाही आम्ही एनडीए सरकारला हरवण्यात यशस्वी ठरू, असा विश्वास देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

आम्हाला देशात नवं राजकारण आणायचं आहे, त्याची सुरूवात आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एमआयएमसोबत युती करून केली होती. त्यात आम्हाला मोठं यश मिळालं होतं. आम्हाला अपेक्षा आहे की हे यश आम्ही पुढं घेऊन जाऊ. जे महाराष्ट्रात झालं नाही, ते बिहारमध्ये होऊ शकतं. बिहार निवडणूक लढवण्यामागचा एकमेव उद्देश हा एनडीएला पराभूत करणं हाच आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 

हेही वाचा - बिहारमध्ये कोरोना संपलाय का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल

बिहारमध्ये मुस्लिम, आंबेडकरवादी, आदिवासी मिळून ४० टक्के जनता आहे. एवढी मोठी जनसंख्या मिळून कुठलंही सरकार आरामात पाडू शकते. सध्याचे सत्ताधारी हे नागरिकता, आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्यामुळेच माझं मौलवी, मौलाना, सुशिक्षित मुस्लिमांना विनंती आहे की याबाबत विचार करा, आपण सगळे मिळून या निवडणुकीत या सरकारला पराभूत करू शकतो, असं आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

बिहारमध्ये होणारी निवडणूक ही देशाच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं आम्ही मानतो. जर सगळ्यांनी मिळून येथील एनडीए सरकार पाडलं, तर केंद्रातील सरकार देखील पाडता येऊ शकेल, असा विश्वास सर्वांमध्ये तयार होईल. या निवडणुकीचं महत्त्व जाणूनच आम्ही इतर पक्षांसोबत आघाडी करत या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

बिहारमध्ये २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

हेही वाचा - बाबासाहेबांचा पुतळा नकोच, कोविड सेंटर उभारा- प्रकाश आंबेडकर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा