Advertisement

बाबासाहेबांचा पुतळा नकोच, कोविड सेंटर उभारा- प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी (VBA) चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पुतळा उभारण्याला ठाम विरोध केला आहे.

बाबासाहेबांचा पुतळा नकोच, कोविड सेंटर उभारा- प्रकाश आंबेडकर
SHARES

दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याचा नियोजीत पायाभरणी समारंभ सरकारकडून अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उत आलेला असताना वंचित बहुजन आघाडी (VBA) चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पुतळा उभारण्याला ठाम विरोध केला आहे. एवढंच नाही, तर पुतळ्यासाठी होणारा खर्च टाळून त्याच पैशात जनतेसाठी कोविड सेंटर बांधा, अशी सूचना देखील प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला केली आहे. 

शुक्रवार १८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्मारकातील आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा सोहळा होणार असल्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (MMRDA)ने स्पष्ट केलं होतं. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला केवळ १६ मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आलं होतं. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासहीत मंत्रिमंडळातील सदस्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. त्यामुळे सर्वांमध्ये नाराजीचा सूर होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलून मोठा वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

तर दुसरीकडे एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा स्मारकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदू मिलमधील स्मारकाची जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. परंतु केवळ राजकीय फायदा घेण्यासाठीच त्याठिकाणी पुतळा उभारण्यात येत आहे. या जागेबाबत वाजपेयी यांनी लिहिलेल्या पत्राचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी करावा आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचं न ऐकता त्याजागी पुतळा उभारण्याऐवजी बाबासाहेबांच्या विचारांना साजेसं संशोधन केंद्र उभारावं. अन्यथा पुतळ्यासाठी हाेणारा खर्च टाळून तो निधी कोविड सेंटर उभारण्यासाठी खर्च करावा, जी सध्याची गरज आहे, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी मोठा वाद टाळला, आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला

काँग्रेसने सर्वात पहिल्यांदा या सेंटरच्या जागी पुतळा उभारण्याचा घाट घातला होता. कारण बाबासाहेबांविषयीचा काँग्रेसच्या मनातला राग अजूनही गेलेला नाही. हे सेंटर उभं राहिलं आणि त्यात खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाच्या संशोधनाचं काम झालं, तर पुन्हा आंबेडकरांसमोर काँग्रेसची इमेज कमी होते, म्हणूनच डाॅ. आंबेडकरांच्या नावे संशोधन केंद्र उभारण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

इंदू मिल इथं उभं राहात असलेलं हे स्मारक ४५० फुटांचं असेल. त्यात डाॅ. आंबेडकरांचा पुतळा ३५० फुटांचा असेल. याआधी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. नव्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची आता जमिनीपासून ४५० फूट इतकी होईल. त्यामुळे आधीचा ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च वाढून १ हजार ८९ कोटी ९५ लाख रुपयांवर गेला आहे. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. स्मारकाचं काम शापूरजी पालनजी कंपनी करणार आहे.

स्मारकात बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. ६८ टक्के जागा मोकळी असेल. या स्मारकासाठी ९ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आले असून  हा प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण होणं अपेक्षित आहे.

हेही वाचा - पुढच्या २ वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण करणार- अजित पवार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा