Advertisement

मुख्यमंत्र्यांनी मोठा वाद टाळला, आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्मारकातील आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा सोहळा होणार असल्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (MMRDA)ने स्पष्ट केलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी मोठा वाद टाळला, आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला
SHARES

दादरच्या इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकातील डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याचा नियोजीत पायाभरणी समारंभ सरकारकडून अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उत आलेला असताना खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यामागाची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये, अशी विनंती देखील केली आहे. (cm uddhav thackeray postpone dr babasaheb ambedkar memorial statue foundation programme in indu mill dadar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१६ मध्ये  इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम झाला होता. त्यानंतर शुक्रवार १८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्मारकातील आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा सोहळा होणार असल्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (MMRDA)ने स्पष्ट केलं होतं. 

परंतु या कार्यक्रमाला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ १६ मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आलं होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मंत्रिमंडळातीलही काही सदस्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण नव्हतं. त्यावरून मंत्रिमंडळात नाराजीचा सूर होता. या सर्वाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलून मोठा वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा - चीनकडून ‘या’ मार्गानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह १० हजार देशवासियांची हेरगिरी

यासंदर्भात माहिती देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, इंदू मिल इथं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभं करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. MMRDA ने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली.

त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केलं. मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणं गरजेचं आहे हे मी लक्षात आणून दिलं. त्यामुळे ठरवल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

इंदू मिल इथं उभं राहात असलेलं हे स्मारक ४५० फुटांचं असेल. त्यात डाॅ. आंबेडकरांचा पुतळा ३५० फुटांचा असेल. याआधी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. नव्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची आता जमिनीपासून ४५० फूट इतकी होईल. त्यामुळे आधीचा ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च वाढून १ हजार ८९ कोटी ९५ लाख रुपयांवर गेला आहे. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. स्मारकाचं काम शापूरजी पालनजी कंपनी करणार आहे.

स्मारकात बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. ६८ टक्के जागा मोकळी असेल. या स्मारकासाठी ९ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आले असून  हा प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण होणं अपेक्षित आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा