२ वर्षांत उभं राहू शकेल आंबेडकर स्मारक, शरद पवार यांचा विश्वास

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी​​​ आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आणि कंत्राटदारांनी ठरवलं, तर या स्मारकाचं काम २ वर्षांत पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

SHARE

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी (Dr B. R. Ambedkar memorial) आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आणि कंत्राटदारांनी ठरवलं, तर या स्मारकाचं काम २ वर्षांत पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी व्यक्त केला. पवार यांनी मंगळवारी दादरच्या इंदू मिल (indu mills) परिसरात साकारत असलेल्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) देखील उपस्थित होते. यावेळी पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

डाॅ. आंबेडकर स्मारकाचं २५ टक्के काम पूर्ण झालं असून ७५ टक्के काम बाकी आहे. ज्या कंपनीकडे या स्मारकाच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती कंपनी आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी आहे. त्यामुळे या कंपनीने ठरवल्यास आणि स्मारकाच्या कामात कुठल्याही परवानग्यांचा अडथळा न आल्याहे हे काम २ वर्षांत पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची १०० फुटांनी वाढणार

काय म्हणाले शरद पवार?

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम २५ टक्के झालं असून ७५ टक्के काम शिल्लक  
  • कंत्राटदारांनी ठरवल्यास आणि परवानग्यांचा अडथळा नसल्यास २ वर्षांत काम पूर्ण होऊ शकतं
  • जगभरातील बौद्ध समाजाला या स्मारकाचं आकर्षण राहील
  • न्यूयाॅर्कमधील स्टॅच्यू आॅफ लिबर्टीप्रमाणे जगभरातील पर्यटक हे स्मारक बघायला येतील 
  • या स्मारकामुळे चैत्यभूमी आणि बाबासाहेब आंबेडकर स्मारक असा संगम तयार होईल
  • भविष्यात होणाऱ्या गर्दीचं नियोजन करण्याची आवश्यकता असेल

ते पुढे म्हणाले, न्यूयाॅर्कमधील (new york) ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ (statue of liberty) बघण्यासाठी जगभरातून लोकं जातात. तसंच आकर्षण पर्यटकांना डाॅ. आंबेडकर स्मारक (Dr B. R. Ambedkar memorial) आणि चैत्यभूमीचं (chaityabhumi) निर्माण झालं पाहिजे. मुंबईत आल्यावर या दोन वास्तू पाहिल्याशिवाय पुढं जाताच कामा नये, असं काम झालं पाहिजे. हे आव्हान कंत्राटदारांनी स्वीकारलं पाहिजे. तसंच भविष्यात होणाऱ्या गर्दीचं नियोजनही करणं आवश्यक आहे, असंही पवार म्हणाले. 

हेही वाचा- बीआयटी चाळीतील डाॅ. आंबेडकरांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित

याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून स्मारकासाठी आवश्यक सर्व परवानग्या महिन्याभराच्या आत देण्यात येतील. शिवाय या स्मारकाला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देताना स्मारकाचं काम पुढच्या २ वर्षांत पूर्ण करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.  

संबंधित विषय
ताज्या बातम्या