Advertisement

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची १०० फुटांनी वाढणार

स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची १०० फुटांनी वाढणार
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवून ३५० फूट इतकी करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याआधी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. या निर्णयामुळे स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण सल्लागार शशी प्रभू यांनी केले. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा खर्च प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्याची प्रतिपूर्ती शासन करणार आहे.

दादरच्या इंदू मिल परिसरातील १२५ एकर जागेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभं राहणार आहे. २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने या स्मारकाची घोषणा केली होती. तर आॅक्टोबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. परंतु अद्याप या स्मारकाची एक वीटही रचण्यात आलेली नाही.

हेही वाचा- पुढच्या २ वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण करणार- अजित पवार

हा प्रकल्प ३ वर्षात होणं अपेक्षित आहे. यासाठी ९ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आले असून सर्व संरचनात्मक आराखड्यांचं १०० टक्के काम पूर्ण होऊन आवश्यक त्या परवानग्या देखील प्राप्त झाल्या आहेत. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या निर्णयामुळे आवश्यक त्या परवानग्या तात्काळ घेण्यात याव्यात असं देखील मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश देण्यात आले.

सध्या या स्मारकाची उंची २५० फूट इतकी असून ती ३५० फुटांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. परिणामी स्मारकाचा खर्चही ७०९ कोटी रुपयांवरून वाढून ९९० कोटी रुपयांवर जाणार आहे. 

पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढेल तसंच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसंच पादपीठामध्ये ६.० मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील.  या स्मारकामध्ये ६८ टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी ४०० लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसंच १००० लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.  

हेही वाचा- इंदू मिल स्मारकाला अजून 3 वर्ष लागणार!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा