पक्षनिष्ठेची बक्षिसी!

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पेडणेकर यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मुंबईचा प्रथम नागरिक बनण्याचा मान दिला.

  • पक्षनिष्ठेची बक्षिसी!
SHARE

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पेडणेकर यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मुंबईचा प्रथम नागरिक बनण्याचा मान दिला. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे. त्याही पेक्षा विधानसभा निवडणुकीत दाखवलेल्या पक्षनिष्ठेचं बक्षिस म्हणून पेडणेकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ घालण्यात आली, त्याचीही सर्वत्र चर्चा सुरू आहे. काही का असेना पण महापालिका सभागृहात शिवसेनेची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडणाऱ्या नगरसेविकाचा यानिमित्ताने यथोचित सन्मान झाला, असंच म्हणावं लागेल.

५७ वर्षांच्या किशोरी पेडणेकर यांचा जन्म वरळीतील गिरणी कामगाराच्या अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. वरळीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढील काही वर्षे नर्सिंगचं काम केलं. लग्ना नंतर न्हावा-शेवा येथील एका रुग्णालयात नर्स म्हणून त्या काम करत होत्या.  

त्यातूनच सामाजिक कामाची आवड निर्माण झालेल्या पेडणेकर यांनी १९९२ मध्ये अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या लोअर परळ, वरळी भागातील महिला कार्यकारिणीत त्या काम करू लागल्या. पक्षाकडून त्यांना रायगड आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काम करण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानंतर उपविभाग संघटक, विभाग संघटक अशा पदांवर काम करत त्या पुढं आल्या.


हेही वाचा- मुंबईत शिवसेनाच किंग, किशोरी पेडणेकर बनल्या नव्या महापौर

सन २००२ मध्ये त्यांना पहिल्यांदा नगरसेविका बनण्याची संधी पक्षाकडून देण्यात आली. या संधीचं त्यांनी सोनं केलं. त्यानंतर २०१२ आणि २०१७ अशा ३ वेळेस त्या शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. पेडणेकर महापालिकेच्या १९१ जी/दक्षिण विभागातील वरळी, गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत. कट्टर शिवसैनिक असलेल्या पेडणेकर यांचा जनसंपर्क सुरूवातीपासूनच अत्यंत दांडगा आहे.

आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी  महापालिका अधिकाऱ्यांना अनेकदा फैलावर घेणाऱ्या पेडणेकर मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे असोत किंवा पाणी तुंबण्याची समस्या महापालिका सभागृहात शिवसेनेची भूमिका मांडण्यातही अग्रस्थनी राहिल्या आहेत. जनतेची कामं मार्गी लावण्यासाठी आक्रमक परंतु तेवढ्याच मनमिळावू स्वभवाच्या पेडणेकर यांना घराघरांत आदराचं स्थान आहे. स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती, सुधार समिती या समित्यांवरील कामाचा त्यांना अनुभव आहे. पेडणेकर यांना २०१७-१८ मध्ये प्रजा फाऊंडेशनचा सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही देण्यात आला आहे. 

तसं पाहायला गेल्या मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत सुरूवातीला शिवसेनेतील अनेक नगरसेवक इच्छुक होते. काही नगरसेवकांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून आपापली नावं पुढं दामटण्याचेही प्रयत्न केले होते. त्यात मंगेश सातमकर, यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, शीतल म्हात्रे, बाळा नर, रमाकांत रहाटे, सुजाता पाटेकर आदी नगरसेवकांचा समावेश होता. 

हेही वाचा- मुंबईला मिळणार नवा महापौर, पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव

परंतु महापालिकेच्या महापौर दालनात शिवसेना सचिव अनिल परब यांनी महापौर आणि सेना नगरसेवकांसोबत बैठक घेऊन पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना मातोश्रीवर बोलावून पेडणेकर यांना महापौरपद देण्यात येत असल्याचं सांगितल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

तेव्हापासून पेडणेकर यांना पक्षनेतृत्वाशी एकनिष्ठ राहण्याचं बक्षीस मिळाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी त्यांनी वरळी मतदारसंघ पिंजून काढला होता. महिलांना एकत्रित करण्यापासून ते पदयात्रा काढण्यापर्यंत. त्यांनी डोअर टू डोअर प्रचार करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत खेचून आणलं होतं. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून त्यांना महापौरपद देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

निष्ठावान अशी ओळख असलेल्या पेडणेकर यांच्यावर मातोश्रीचाही भरवसा असल्यानेच महापौरपद महिला आरक्षित नसतानाही पुरूषांना डावलून पेडणेकर यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली होती. त्यामुळे हा क्षण त्यांच्यासाठी नक्कीच लाखमोलाचा असेल.

 हेही वाचा- 

मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या 'ह्या' नगरसेवकांमध्ये स्पर्धा

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार नाही- मनोज कोटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या