Advertisement

भांडुपमधील शिवसेनेचे अस्तित्व संपवण्याचा डाव


भांडुपमधील शिवसेनेचे अस्तित्व संपवण्याचा डाव
SHARES

मुलुंड हा भाजपाचा तर भांडुप हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु आता भांडुपमधील चार नगरसेवकांच्या प्रभागांचा मुलुंडमधील टी प्रभागात समावेश करून एकप्रकारे प्रशासनाला हाताशी धरून भांडुपमधील शिवसेनेचे अस्तित्व कमी करण्याचा भाजपाचा डाव असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रभाग कार्यालयाच्या फेररचनेलाच शिवसेनेने विरोध दर्शवला असून, प्रसंगी हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

महापालिकेतील प्रभागांच्या नवीन रचनेनुसार विभाग कार्यालयांचे विभाजन आणि पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या सभेमध्ये या विषयावर चर्चा झाली असून, भांडुपच्या एस विभागातील चार नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश मुलुंडच्या टी विभागात करण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. 

सध्या एस व टी प्रभाग समिती असून, एस प्रभागात 13 तर टी प्रभागात 6 नगरसेवक आहेत. परंतु आता टी प्रभाग समिती स्वतंत्र करण्यासाठी एस विभागातील 4 नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश टी विभागात करण्यात येणार आहे. भांडुपमधील नगरसेवकांच्या प्रभागाचा समावेश मुलुंडमध्ये केल्यास चार प्रभागातील नागरिकांना आपल्या नागरी सुविधांच्या कामांसाठी मुलुंडला जावे लागेल. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होण्याची शक्यता असून, प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावाला आपला विरोध आहे. परंतु यावर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सूचना देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार आम्ही आमच्या सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे महापौरांनी हा प्रस्ताव राखून ठेवला असून, जर पुढील बैठकीत यावर प्रशासनाने ठोस उत्तर न दिल्यास हा प्रस्ताव फेटाळून लावला जाईल, असे कोरगावकर यांनी स्पष्ट केले.

एफ उत्तर आणि एफ दक्षिण प्रभाग कार्यालयांमधील नगरसेवकांची अदलाबदली करण्यात येणार असल्यामुळे सध्याचे पाच उद्यान अर्थात फाईव्ह गार्डनचा परिसर दोन प्रभागांमध्ये विभागला जाणार आहे. पारशी कॉलनीही दोन प्रभागांमध्ये विभागली जाणार आहे. त्यामुळे याला आधीच विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विरोध दशर्वला आहे. तर कुर्ल्यातील काही प्रभाग एम पश्चिम विभागात समाविष्ट करण्यात येत असल्यामुळे मनसेचे दिलीप लांडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

संबंधित विषय
Advertisement