Advertisement

Raj Thackeray: लॉकडाऊन हवं का नको? मनसेनं सुरू केलं सर्वेक्षण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षातर्फे आता लाॅकडाऊन हवं की नको, यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे.

Raj Thackeray: लॉकडाऊन हवं का नको? मनसेनं सुरू केलं सर्वेक्षण
SHARES

कोरोनाबाबत सावधगिरी बाळगा परंतु उगाच भीती करत बसू नका, लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने लाॅकडाऊन हटवायला हवं, अशी भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षातर्फे आता लाॅकडाऊन हवं की नको, यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. (raj thackeray led maharashtra navnirman sena start online survey on lockdown in maharashtra)

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या आॅनलाईन सर्वेक्षणाची लिंक आपल्या ट्विटर हँडलवरून सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. हे ऑनलाईन सर्व्हेक्षण १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या सर्वेक्षणातील नोंदी हाती आल्यानंतर मनसेतर्फे पुढील रणनिती ठरवण्यात येणार आहे.

या आॅनलाईन सर्वेक्षणात ९ प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामध्ये लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का?, लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का?, लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी व उद्योग-धंद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे का?, राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का?, शालेय शुल्काबाबतच्या सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत आहे का?, लोकल रेल्वेसेवा आणि एस.टी. सेवा पूर्ववत सुरू झाली पाहिजे का?, लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का?, लॉकडाऊन काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत व योग्य मिळाली आहे का?, या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यानी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का? या प्रश्नांचा समावेश आहे. या प्रश्नाच्या समोर होय, नाही, माहीत नाही या ३ पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय मत नोंदवणाऱ्याला निवडायचा आहे. सोबतच आपलं नाव, मोबाइल क्रमांक आणि राहण्याचं ठिकाण याचीही नोंद करायची आहे.

हेही वाचा - Raj Thackeray: राज ठाकरेंनी केलं ठाकरे सरकारबद्दल ‘हे’ भाकीत

राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा. उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसत नाहीय, दिसला नाही. कोरोनाबाबत लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली आहे, माध्यमांनी देखील ही भीती वाढवली. कोरोनाचा संसर्ग गंभीर आहे, पण त्याचा बाऊ खूप केला गेला. आणि मोठ्या घरांचं ठीक आहे पण झोपड्यांमध्ये कुठून क्वारंटाईन होणार होते? लॉकडाऊन उठवण्याचा नक्की आराखडा काय? किती काळ लॉकडाऊनमुळे लोकांची फरफट करणार? हे सरकारने स्पष्ट करायला हवं. आता सगळं सुरळीत करावंच लागेल. कोरोना विषाणूसोबत जगावंच लागेल, असं मत राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं.

हेही वाचा - Raj Thackeray: मराठी मुलांना नोकऱ्या देण्यासाठी सरकारने धोरण आखावं- राज ठाकरे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा