SHARE

मनसेने दादर परिसरात पोस्टरबाजी करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, अशी घणाघाती टीका करणारे पोस्टर्स मनसेने दादर भागात लावले आहेत.

मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक फोडून, शिवसेनेने मास्टरस्ट्रोक मारला आहे. मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना फोडण्यात शिवसेनेला यश मिळालं. त्यानंतर मनसेने आता शिवसेनेवर पोस्टर्सच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

मनसेचे मुंबई महापालिका निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक सध्या मनसेसोबत आहेत. संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता. पक्षासाठी हल्ला सहन करणारे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे मनसेसोबत आहेत.

भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या