Advertisement

मनसेच्या पराभवाचं ‘राज’कारण


मनसेच्या पराभवाचं ‘राज’कारण
SHARES

विजयाचे वाटेकरी अनेक असतात. मात्र पराभवाला कुणी वाली नसतो, याचीच प्रचिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना गुरुवारी आली. मुंबई महानगरपालिकेत पक्षाला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाच्या चिंतन बैठकीत पक्षाचे नेता आणि सरचिटणीस यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला काही अंशी जबाबदार मानत पक्षाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. मनसेमध्ये राज ठाकरे यांची एकाधिकारशाही चालते, या नियमाला ही बैठक अपवाद ठरली.

मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालानंतर थंडावलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाला आता नव्यानं वंगण देण्याचं काम पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केलं आहे. कौटुंबिक कारणासाठी परदेशात गेलेले राज ठाकरे यांनी मुंबईत परतताच पक्षाचे नेता, सरचिटणीस आणि सचिवांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत पालिका निवडणुकीतल्या पराभवाची मिमांसा करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनेक महत्त्वाच्या विषयांवरची भूमिका जनतेपर्यंत पोहचली नाही, अशी खंतवजा तक्रार पदाधिकाऱ्यांनी नोंदवली. यावर प्रत्युत्तर देताना, “माझी भूमिका जनतेपर्यंत पोहचवण्यात तुम्ही कमी पडलात,” असं म्हणत राज यांनी पराभवाची जबाबदारी मनसे पदाधिकाऱ्यांवर ढकलली. “मराठीसह इतर भाषिकांपर्यंत पक्ष न्यायला हवा” या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेवर राज ठाकरे यांनी, “पक्षाला मतदारांनी मत नाही दिलं तरी चालेल, पण मराठीचा मुद्दा अजिबात सोडणार नाही” अशी भूमिका मांडली.

[हे पण वाचा- हा शेवटचाच पराभव - राज ठाकरे]

पालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या सर्वांविरोधात कारवाई करणार असल्याचं राज ठाकरे यांनी बैठकीत जाहीर केलं. तसंच लवकरच राज ठाकरे मुंबईतल्या सहाही लोकसभा मतदारसंघात विभागनिहाय कार्यकर्त्यांना भेटून पक्षाची पुढची दिशा ठरवतील. येत्या काही दिवसांत बैठक घेऊन तीन महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीत पक्षाची व्यूहरचना ठरवणार आहेत. नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची विनंती करणाऱ्या शिशिर शिंदे यांच्याशी राज ठाकरे प्रत्यक्ष बोलून या विषयावर निर्णय घेणार आहेत. ही माहिती मनसेचे नेता बाळा नांदगावकर यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा