स्थायी समिती अध्यक्षपदी रमेश कोरगावकर बिनविरोध

  BMC
  स्थायी समिती अध्यक्षपदी रमेश कोरगावकर बिनविरोध
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी रमेश कोरगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने स्थायी समिती अध्यक्षपदासाठी कुणीही उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे कोरगावकर यांची बिनविरोध निवड झाली असून मंगळवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पिठासीन अधिकारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी रमेश कोरगावकर यांच्या नावाची घोषणा केली. 

  स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वतीने रमेश कोरगावकर यांची आयत्या वेळी उमेदवारी जाहीर झाली. मंगेश सातमकर यांचा पत्ता शेवटच्या क्षणाला कापून रमेश कोरगावकर यांचे नाव शिवसेनेने जाहीर केले. त्यामुळे रमेश कोरगावकर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी महापालिका चिटणीस नारायण पठाडे यांना सादर केला होता. परंतु विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेसने आपला उमेदवार न दिल्यामुळे अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होईल, हे स्पष्ट झाले होते. परंतु, निवडणुकीची औपचारिकता मंगळवारी झाल्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी विरोधी पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज सादर न झाल्यामुळे रमेश कोरगावकर यांची स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

  रमेश कोरगावकर हे भांडुपमधील प्रभाग 104 मधून निवडून आले आहे. सलग चौथ्यांदा ते भांडुपमधून निवडून आले आहे आहेत. यापूर्वी त्यांनी स्थापत्य (उपनगरे)समितीचे अध्यक्षपद भुषवले आहे. स्थायी समितीचे सलग सात वर्षे ते सदस्य आहेत. मागील वर्षी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. परंतु शिवसेनेने पुन्हा एकदा यशोधर फणसे यांनाच अध्यक्षपदावर कायम ठेवल्यामुळे कोरगावकर यांची समिती अध्यक्ष बनण्याची संधी हुकली होती. हा विजय माझा नसून मुंबईकरांचा आहे, असे सांगत बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार रमेश कोरगावकर यांनी मानले. मुंबईतील वाढत्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी सूचना कोरगावकर यांनी केली. पाणी पुरावठ्याबाबत मुंबईतील नागरिक समाधानी नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, याकडे प्रशासनाने लक्ष पुरवून त्यासाठी तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी भाषणात केल्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.