रतन टाटा राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

 Mumbai
रतन टाटा राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

मुंबई - देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी नामांकित उद्योगपती रतन टाटा यांचं नाव चर्चेत येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यकारिणी यांच्यात या विषयावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने देशाच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून रतन टाटा यांचं नाव पुढे करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाटा यांच्या नावाला अनुकूलता दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या आठवड्यातच याबाबतीत ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केल्यास शिवसेना पाठिंबा देईल, अशी ग्वाही शिवसेनेचे प्रवक्ता आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी भाजपाने न मागताच दिली होती. भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च पदावर आरुढ करण्याला समर्थन देत भाजपाला राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न होता. मात्र स्वतः सरसंघचालकांनी आपण संघात आल्यावर स्वतःसाठी इतर मार्ग बंद केल्याचं सांगत आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरण्याची सूतराम शक्यता नसल्याचं सांगून टाकलं. त्यानंतर हायसं वाटलेल्या भाजपा नेत्यांसमोर रतन टाटा यांचं नाव पुढे आणत संघानं भाजपाचं काम अधिक सोपं करून टाकलं आहे. भाजपाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण आडवाणी यांच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण आडवाणी यांच्या नावाला पक्षातच ‘आम सहमती’ मिळवणं अवघड होत चाललं आहे. नावापुरता मित्रपक्ष शिवसेनेसह एनडीएतील इतर घटकपक्ष आणि अगदी विरोधी पक्षालाही नाकारता येणार नाही, असे उमेदवार म्हणून रतन टाटा यांच्याकडे निश्चितच पाहिलं जातं.

अर्थात, सारं काही ठरलं आहे, अशातला मात्र भाग नाही. रतन टाटा यांची राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी भाजपाला अनेक मुद्द्यांचा परामर्श घ्यावा लागणार आहे. आता सूत्रांच्या हव्याल्यानं ही महत्त्वाची माहिती पुढे येत असताना रतन टाटा यांची तीनेक महिन्यांपूर्वीची नागपूर भेट, विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी आलेले संघाचे प्रचारक, टाटा यांची आधी रेशीमबाग आणि नंतर संघाच्या मुख्यालयाला दिलेली भेट आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी सुमारे पाउण तास चाललेली चर्चा आदींमधले अन्वयार्थ स्पष्ट होताना दिसत आहेत, हे मानायलाच हवं. अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी राष्ट्रपतीपदासाठी रतन टाटा यांच्याच नावाला संघाची पहिली पसंती राहील, याचे संकेत मात्र मिळत आहेत.

Loading Comments