Advertisement

आणीबाणी राज्यात की देशात? ठाकरे-फडणवीसांमध्ये खडाजंगी

सोमवारपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात अघोषित आणीबाणीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आणीबाणी राज्यात की देशात? ठाकरे-फडणवीसांमध्ये खडाजंगी
SHARES

राज्यात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे. सरकारविरोधात कोणी बोललं की तुरुंगात टाकलं जातंय, असा घणाघाती आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला असताना दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही सद्भावनेची गोष्ट आहे का? महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असेल तर देशात घोषित आणीबाणी आहे का? असा प्रश्न विचारत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. सोमवारपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात अघोषित आणीबाणीवरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर आरोपांचा भडीमार केला. आज शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. अनेक ठिकाणी कवडीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पण या सरकारला चर्चाच होऊ द्यायची नाही. त्यामुळे केवळ २ दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलेलं आहे. कोरोनाच्या संपूर्ण काळाचा पंचनामा करण्याची गरज आहे. या काळातला भ्रष्टाचार संताप आणणारा आहे. ४८ हजार मृत्यू राज्यात झालेले असताना सरकार स्वतः स्थिती हाताळणीचा दावा का करते, हे अनाकलनीय आहे. 

हेही वाचा- आजपासून हिवाळी अधिवेशन गाजणार, 'या' अध्यादेशांवर होणार चर्चा

महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शक्ती कायद्यावर सविस्तर चर्चा होणं अपेक्षित आहे. मराठा आरक्षणावर सरकार अपयशी. सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळणं हे दुर्दैवी. आज ओबीसी आरक्षण संदर्भात मंत्रीच प्रश्न उपस्थित करीत आहेत. समाजामध्ये भयाचं वातावरण आहे. ते तत्काळ दूर करणं गरजेचं आहे. संसदेत कृषी विधेयकावर चर्चा झाली नाही, असे आरोप करतात. पण ते खरं नाही. जेव्हा चर्चेचा आग्रह धरला गेला, तेव्हा गोंधळ घातला गेला, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं.

तर या आरोपांना उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनीही तितक्याच ठामपणे उत्तर दिलं. कोरोना संकट, निसर्ग वादळ, अवकाळी पाऊस अशा अनेक संकटातून राज्य सरकार मार्ग काढतं आहे. मराठा आरक्षण देत असताना कुणाचेही हक्क मारले जाणार नाही. ओबीसी समाजाला आरक्षण देताना कुणाचाही हक्क कुणीही हिरावून घेणार नाही. विरोधक उगाचच समाजाला भडकवण्याचं काम करत आहे. 

कोरोना काळात राज्य सरकार मार्ग काढत असताना विरोधक फक्त राजकारण करत आहेत. कोरोनाच्या काळात राज्य सरकारच्या तिजोरीवर भर पडला आहे. अजूनही केंद्राकडून राज्याचे २८ हजार कोटी येणं बाकी आहे. कामगार, शेतकऱ्यांच्या न्याय हक्काबाबत कोणी बोललं तर ते देशद्रोही. विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? पाकिस्तानमधून कांदा आणणारे तुम्हीच. आता पाकिस्तानमधून शेतकरी आणताहेत का?  कांदा आणि साखर आयात करून त्याच्यावर अन्याय का केला जातोय? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना सुनावलं.

(raw between devendra fadnavis and uddhav thackeray over maharashtra legislative assembly winter session)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा