Advertisement

मुंबई महापालिका निवडणुकीत विक्रमी मतदान


मुंबई महापालिका निवडणुकीत विक्रमी मतदान
SHARES

मुंबई - मुंबई महापालिका निवडणूक मतदान प्रक्रिया मंगळवारी काही किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडली. महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक अर्थात 55. 28 टक्के एवढे विक्रमी मतदान झाले असून वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडेल हे येत्या गुरुवारी स्पष्ट होणार आहे. महापालिकेतील अनेक दिग्गजांसह तब्बल 2275 उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले आहे.
मुंबईतील 7 हजार 304 मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी साडेसात वाजता सर्व मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. मात्र अनेक ठिकाणी मतदार यादीतील घोळामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही मतदार केंद्रांबाहेर तसेच मतदारसंघातील काही भागांमध्ये मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी खटाटोप सुरू होता. अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तरीही मतदानाचा टक्का विलक्षण वाढला. संध्याकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना चिठ्ठी ठेवून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यास दिला. त्यामुळे मुंबईत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊन सरासरी 55.28 टक्के मतदान झाले आहे. यापूर्वी 2007 च्या सार्वत्रिक निवडणुकीत (46.05 टक्के) तर 2012 च्या सार्वत्रिक निवडणुकीत (44.75 टक्के) एवढे मतदान झाले. परंतु यावेळच्या मतदानात तब्बल 11 टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
टक्का वाढला, फायदा कुणाला?
यंदा झालेले 55. 28 टक्के एवढे मतदान हे मागील 25 वर्षांतील सर्वाधिक विक्रमी मतदान मानले जात आहे. या वेळी राज्य निवडणूक आयोगाने तसेच मुंबई महापालिका यांनी मतदारांमध्ये जनजागृती करून मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मात्र मतदानाचा टक्का वाढला असला तरी याचा फायदा कुणाला होणार आहे, याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे.
मतदानाचा टक्का वाढणे हे सत्ताधारी पक्षासाठी घातक मानले जाते. परंतु या वेळी राज्य निवडणूक आयोगाच्या मतदानाच्या जनजागृतीमुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्यामुळे याचा संमिश्र फायदा सर्व पक्षांना होणार आहे.
रणरणत्या उन्हात मतदार
मुंबईतील बहुतांशी मतदार केंद्र ही बंदिस्त अर्थात शाळा, सभागृह आदींमध्ये बनवण्यात आली होती. परंतु मुंबईतील 827 ठिकाणी खुल्या जागेत तंबू बांधून मतदान केंद्र बनवण्यात आली होती. त्यामुळे याठिकाणी मतदारांना रणरणत्या उन्हात उभे राहुन मतदान करावे लागेल. निवडणूक कर्मचारी, पोलीस यांच्यासाठी योग्यप्रकारे सुविधा नसल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला होता.
मतदानापूर्वी आणि मतदानाच्यावेळी कंट्रोल युनिट बदलले
सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी एकूण 61 कंट्रोल युनिट आणि 52 बॅलेट युनिट बदलण्यात आले. तर मतदान सुरू असताना 9 कंट्रोल रुम आणि 12 बॅलेट युनिट बदलण्यात आले होते. नादुरुस्त मतदान यंत्र तसेच नादुरुस्त मतदान यंत्राच्या बदल्यात वापरण्यात आलेली मतदान यंत्र या दोन्हीमध्ये नोंदवलेला मतांची एकत्रित मोजणी करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 7994 युनिटपैकी 7285 युनिट सिलबंद करण्यात आले असल्याची माहितीही महापालिकेने दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा