Advertisement

राज्यात सिंह, वाघ, बिबळ्या एकत्र राहणार - रामदास आठवले


राज्यात सिंह, वाघ, बिबळ्या एकत्र राहणार - रामदास आठवले
SHARES

देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार असून त्यात वाघ, बिबळ्या आणि सिंह एकत्र गुण्यागोविंदाने राहणार आहेत. विरोधकांनी त्याची काळजी करू नये, अशी कोपरखळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका कार्यक्रमात मारली.

आठवले यांनी त्यांचा मुलगा जीत याच्या नावे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्याला दत्तक घेतले. त्यानंतर या बिबळ्याचे त्यांनी 'भीम' असे नामकरण केले. शिवसेनाप्रमुखांनी यापूर्वी वाघ दत्तक घेतला होता, याची आठवण करून देत आठवले यांनी आपल्या मिश्किल शैलीत सर्वजण एकत्र राहणार असल्याचे सांगितले.

आठवले पुढे म्हणाले, बिबळ्या हा शांत स्वभावाचा प्राणी असून तो सहसा कुणाच्या वाटेला जात नाही. परंतु त्याला त्रास देणाऱ्यालाही तो सोडत नाही. हीच शिकवण आम्हा कार्यकर्त्यांना मिळालेली आहे. भारतीय दलित पँथर संघटनेवर आपले जिवापाड प्रेम होते. तरीही रिपब्लिकन ऐक्यासाठी ही संघटना बरखास्त केली. मात्र आजही आपण आपल्या प्रत्येक भाषणात दलित पँथरच्या आठवणीत रमतो. हेच पँथर प्रेम लक्षात घेता दहिसर तालुकाध्यक्ष दिलीप व्हावळे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्याला अर्थात एका पँथरला अधिकृतरित्या दत्तक घेण्याचा योग जुळून आला आहे.

एकीकडे देशभरात वाघांची संख्या कमी होत असताना त्यांच्या देखभालीसाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा उपक्रम आयोजित केल्याचे मत व्हावळे यांनी यावेळी व्यक्त केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे वन्यजीव दिनानिमित्त प्राणी दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. त्या योजनेंतर्गत प्राण्याच्या वर्षभराच्या पालनपोषणाचा खर्च दत्तक घेणाऱ्या व्यक्तीने करायचा असतो.

उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांच्या हस्ते आठवले कुटुंबीयांना यावेळी दत्तक प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी वनसंरक्षक राजेंद्र पवार, देवरे, सीमा आठवले, जीत आठवले, अॅड अभयाताई सोनावणे, चिंतामण माली, रमेश गायकवाड, डॉ रोहिदास वाघमारे, चंद्रमणी मनवर उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा