Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबादेत येऊन कोरोना पसरवला; शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका

'ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा जहाल संसर्गजन्य असा नवा अवतार आढळून आल्यानंतर साऱ्या जगाने ब्रिटनवर जणू सामाजिक बहिष्कारच टाकला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबादेत येऊन कोरोना पसरवला; शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका
SHARES

'ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा जहाल संसर्गजन्य असा नवा अवतार आढळून आल्यानंतर साऱ्या जगाने ब्रिटनवर जणू सामाजिक बहिष्कारच टाकला आहे. ब्रिटनमधील विषाणूचा धसका असा की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई-ठाणे-पुणेसारख्या शहरांना मोठी आर्थिक झीज सोसावी लागेल, पण सावधगिरीचा उपाय म्हणून ही कठोर पावलं उचलावीच लागणार आहेत', असं अग्रलेखात म्हटलं आहे.

'ब्रिटनहून कालपर्यंत जे आले त्यांना १४ दिवस क्वारंटाईन केलं. प्रश्न आहे ब्रिटिश पंतप्रधान जॉन्सन यांचा. दिल्लीतील २६ जानेवारीच्या सोहळ्यात जॉन्सनसाहेब प्रमुख पाहुणे आहेत. त्यामुळे 'बहिष्कृत' ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे दिल्लीत येतील काय? मागे 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमासाठी ट्रम्प हे अहमदाबादेत आले व ट्रम्पबरोबरच्या लवाजम्यानं कोरोना पसरविण्याचं काम केलं. त्यामुळं ट्रम्पच्या तुलनेत सज्जन व सरळ असलेल्या जॉन्सन यांच्याबाबतीत काय करायचं, हा प्रश्नच आहे', असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

आपल्या देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मते नव्या विषाणूला घाबरण्याची गरज नाही. देश सतर्क आहे. त्याचवेळी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅकॉक म्हणतात, नवा कोरोना व्हायरस पहिल्यापेक्षा जास्त खतरनाक असून तो वेगाने हल्ला चढवतो. त्याची संसर्ग क्षमता आधीच्या विषाणूपेक्षा ७५ टक्के जास्त आहे. ही माहिती मन विषण्ण करणारी आहे. त्यामुळं भारताच्या आरोग्यमंत्रीनी काहीही म्हटलं असलं तरी चिंता करावी लागेलच, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

भारताला पहिल्या कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही, तेथे दुसऱ्या कोरोनाचे काय घेऊन बसलात? 'आऊट ऑफ कंट्रोल' म्हणजे सुसाट सुटलेला हा विषाणू नियंत्रणाच्याही पलीकडे आहे, असे नव्या विषाणूचे वर्णन इंग्लंडच्या आरोग्य खात्याने केले आहे. त्यामुळं जगातील बहुतेक देशांनी ब्रिटन बरोबरचे हवाई संबंध तोडले आहेत.

ऑस्ट्रेलियात नव्या कोरोना विषाणूचे ८३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानं तेथील अनेक राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एकंदरीतच, काळजी करावी अशी परिस्थिती नव्यानं निर्माण झाली असल्याचं मत अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

'महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करून सावधानता बाळगली, पण दुसऱ्या कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांच्या पोटावरच पाय आला. सगळ्यांचेच चेहरे काळजीनं करपून गेलेले दिसतात. काय करावे? कसे करावे? उद्या काय होणार? हीच चिंता ज्याला त्याला लागून राहिली आहे. लोकांच्या सोशिकपणालाही मर्यादा आहेत हे मान्य, पण आज तरी आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही', असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा