Advertisement

राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे?- शिवसेना

राज्यपालच काय, मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येणार नाही. मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे?

राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे?- शिवसेना
SHARES

राज्यपालच काय, मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येणार नाही. मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? महाराष्ट्राचे राज्यपाल हे सन्माननीय व्यक्ती आहेतच. पण ते ज्या पदावर सध्या विराजमान आहेत त्या पदाचा मान व प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्यांचीही तितकीच आहे. राज्यपालांना भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडलं जात आहे व त्यात राज्यपालांचंच अधःपतन सुरू आहे, अशा शब्दांत शिवसेनेचं (shiv sena) मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर भाष्य करण्यात आलं आहे.

राज्यपालांना सरकारी विमानातून उत्तराखंडला जाण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने त्यांना ऐनवेळी विमानातून खाली उतरावं लागलं. या प्रकारामुळे महाविकास आघाडी आणि राज्यपाल तसंच भाजपसोबतच्या (bjp) वादात नव्या अध्यायाची भर पडली आहे. यावर भाष्य करताना सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे की, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आल्यापासून हा साधा माणूस या ना त्या कारणाने चर्चेत किंवा वादात राहिला आहे. वाद निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही व राज्यपालांनी तर शहाण्यासारखे वागावे असे संकेत असतानाही महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत, हा प्रश्नच आहे.

हेही वाचा- भाजपच्या विरोधानंतर शिवजयंतीच्या नियमात बदल, 'अशी' आहे नवी नियमावली

राज्यपालांच्या कार्यालयाने विमान उडवण्याची परवानगी मागितली व एक दिवस आधीच सरकारने परवानगी नाकारूनही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवले? असा हटवादीपणा करण्याचे कारण काय? 

मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? पण महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हा विमान-वाद वेगळ्याच हवेत उडवू लागले आहेत. राज्यपालांना विमान नाकारलं हा सरकारचा अहंकार असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मारला. भाजप नेत्यांच्या तोंडात अहंकाराची भाषा शोभत नाही. सध्या अहंकाराचे राजकारण कोण करीत आहे ते संपूर्ण देश जाणतोय. दिल्लीच्या सीमेवर दोनशे शेतकऱ्यांनी प्राणार्पण करूनही सरकार कृषी कायद्यांबाबत मागे हटायला तयार नाही. त्यास अहंकार नाही म्हणायचे तर काय?

राज्यपालांना भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडलं जात आहे व त्यात राज्यपालांचंच अधःपतन सुरू आहे. राज्यपालांना राजकीय कळसूत्री बाहुल्याप्रमाणे कुणी नाचवणार असेल तर तो घटनेचाही अपमान आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा