Advertisement

'हवं तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारणारच'


'हवं तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारणारच'
SHARES

मुख्यमंत्र्यांना अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून हवे तर मला कोठडीत घाला पण मी सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारतच राहणार, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.


सावंत यांचं स्पष्टीकरण

‘रिव्हर मार्च’ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे भाजपाने सावंत यांच्याविरूद्ध हक्कभंग दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. हक्कभंग दाखल करण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आश्चर्यकारक आहे. ही शुद्ध दडपशाही आहे. विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सरकार कोणत्या थराला जाऊ शकते, याचं उत्तम उदाहरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी सत्ता असेल, अपार शक्ती असेल. पण मी सामान्य नागरिक असलो तरी माझ्याही पाठीशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

ही जाहिरात तयार करताना उघडउघड सत्तेचा दुरूपयोग आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे. या परिस्थितीत जबाबदार विरोधी पक्षाचे कर्तव्य आणि एक भारतीय नागरिक म्हणून प्राप्त अधिकारानुसार मी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले. हे प्रश्न सरकारसाठी अडचणीचे ठरले आहेत. त्यांनी यावर केलेले खुलासे समाधानकारक नाहीत. त्यामुळे सरकारने कारागृहात डांबले तरी मी प्रश्न विचारणे सोडणार नाही, असा इशाराही सावंत यांनी दिला आहे.


विरोधकांचा पत्रकारांशी संवाद सरकारला खुपतो

या वादग्रस्त जाहिरातीच्या चित्रिकरणासाठी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्याचा झालेला वापर, विनोद तावडे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या विविध नेत्यांच्या पत्रकार परिषदा आणि तिथे स्थापन झालेले भाजप कार्यालय, शासकीय बंगल्यात सुरू झालेले शिवसेनेचे कार्यालय, वर्षा निवासस्थानी होणाऱ्या भाजप कोर ग्रुपच्या बैठकी, यावर आजपर्यंत कधीही आक्षेप न घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षांनी शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधणेही का सहन होत नाही, असा खोचक प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन यांनी विचारला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा