अडीच दशकांनी लाभला मुंबईला शिवसेनेचा उपमहापौर

 Mumbai
अडीच दशकांनी लाभला मुंबईला शिवसेनेचा उपमहापौर
Mumbai  -  

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढणाऱ्या शिवसेना आणि भाजपाने महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पाठिंबा कायम ठेवला. त्यामुळे शिवसेना उमेदवार हेमांगी वरळीकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. हेमांगी वरळीकर यांना १६६ तर काँग्रेसच्या उमेदवार विनी डिसोझा यांना ३१ मते पडली. आजवर शिवसेनेचा महापौर निवडून येण्याची परंपरा आहे. उपमहापौरपद हे कायम भाजपाकडे असते. परंतु यावेळी भाजपाने उमेदवार न दिल्यामुळे प्रथमच शिवसेनेच्या महापौरांसह उपमहापौर महापालिकेत विराजमान झाला आहे. त्यामुळे मागील अडीच दशकात प्रथमच शिवसेनेचा उपमहापौर बनला आहे.

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकर आणि काँग्रेसच्या उमेदवार विनी डिसोझा उभ्या होत्या. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना १७१ मते मिळाली होती. परंतु उपमहापौरपदाच्या उमेदवार असलेल्या वरळीकर यांना केवळ १६६ मते मिळाली. तर पाच मते अवैध ठरली. तर सपा, राष्ट्रवादी काँग्रेससह एआयएमआयएमचे सदस्य तटस्थ राहिल्यामुळे तसेच मनसेचे आणि एमआयएमचा एक सदस्य गैरहजर राहिल्यामुळे डिसोझा यांना ३१ मते पडली. त्यामुळे पिठासीन अधिकारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी वरळीकर हे विजयी झाल्याचे जाहीर केले.


बाळासाहेब आणि मोदींचा जयजयकार

महापौरपदी महाडेश्वर यांचा विजय झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत 'एकच साहेब बाळासाहेब' म्हणत बाळासाहेबांचा जयजयकार करून सभागृह दणाणून सोडले. मात्र, याला चोख प्रत्युत्तर भाजपाने उपमहापौरपदाच्या निवडणुकीत दिले. उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर पिठासीन अधिकारी विजयी उमेदवाराचे नाव सुरु करणार एवढ्यात भाजपाच्या नगरसेवकांनी 'मोदी… मोदी…' अशा घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा जयजयकार केला. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये पहिल्याच सभागृहात घोषणायुद्ध रंगलेले पहायला मिळाले असून, पुढील सभागृहात हेच चित्र पहायला मिळेल असे चित्र आहे.

Loading Comments