स्टँडिंगमधील शिवसेनेची अंडस्टँडिंग फसली, जाधव-कोरगांवकरांमध्ये जुंपली

  Mumbai
  स्टँडिंगमधील शिवसेनेची अंडस्टँडिंग फसली, जाधव-कोरगांवकरांमध्ये जुंपली
  मुंबई  -  

  महापालिकेतील शिवसेना नेत्यांमधील अंतर्गत कलह आता वाढतच चालला आहे. रस्त्यांच्या मुद्द्यांवरून प्रशासनाची पाठराखण केल्यावरून मागील सभेत मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांनी अध्यक्षांवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मंगळवारी झालेल्या सभेत सभागृहनेते यशवंत जाधव यांच्या भूमिकेमुळे अध्यक्षांना यू टर्न घेऊन काँग्रेसने मांडलेली झटपट सभा तहकुबी मंजूर करावी लागली. यशवंत जाधव यांनी या तहकुबीला विरोध न करता आपले मत मांडत घातलेल्या घोळामुळे बैठकीपूर्वी ठरवलेल्या रणनितीवर पाणी फेरले गेले. स्टँडींगपूर्वीची ही अंडरस्टँडींग सभागृहनेत्यांमुळे फसल्यामुळे अध्यक्षांनी आपल्या दालनात जाधव यांची कानउघडणी केली. त्यामुळे दोघांमध्ये बंद दाराआड चांगलीच जुंपली. दोघांमध्ये मोठमोठ्या आवाजात भांडण सुरु झाल्यामुळे अखेर शिवसेनेच्या नगरसेवकांना अध्यक्षांच्या दालनातून बाहेर पडण्याची वेळ आली.

  मुंबईतील नगरसेवकांना टोलमाफी देण्याचा ठराव केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झालेले असतानाच पुन्हा एकदा त्यांचा पारा वाढवण्याची वर्तणूक सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केली आहे. नालेसफाईचे काम पूर्ण न झाल्यामुळे तसेच निरुपम यांना प्रवेश नाकारल्यामुळे विरोधी पक्षनेते रवी राजा हे सभा तहकुबी मांडणार होते.

  या सभा तहकुबीला विरोध दर्शवण्याची रणनिती अध्यक्षांच्या दालनात ठरली. अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्यासह सभागृहनेते यशवंत जाधव आणि भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी याला विरोध करण्याचे ठरवले. परंतु प्रत्यक्षात यशवंत जाधव यांनी विरोध केलाच नाही. त्यांनी केवळ मत व्यक्त केले. सभा तहकुबीवर विरोध असल्यास ती नामंजूर करता आली असती. पण यशवंत जाधव यांनी आयत्यावेळी भूमिका बदलल्यामुळे ती मंजूर करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली.

  त्यामुळे बैठक आटोपून यशवंत जाधव समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्या दालनात गेल्यानंतर कोरगावकर यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांच्यावर चांगलाच भडीमार केला. यावर जाधव चांगलेच भडकले आणि तुम्ही आम्हाला शिकवणार का? असा सवाल करत मग तुम्ही का बोललात नाही, असा प्रतिसवाल केला. यावरून मग संतप्त झालेल्या जाधवांनी, तुम्ही माझ्याशी काहीच चर्चा करत नाही. मीच नेहमी तोंडघाशी पडतो, अशा शब्दांत अध्यक्षांशी भांडायला सुरुवात केली.

  त्यांच्या भांडणाचा आवाज एवढा वाढला होता की, बंद दाराबाहेरही तो ऐकू येत होता. जाधव यांच्यामुळे शिवसेना स्थायी समितीत तोंडघाशी पडली. मात्र, तरीही जाधव यांचाच उलट आवाज चढल्यामुळे अध्यक्षांच्या दालनात गेलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी अधिक हसे नको म्हणून तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दोघांमध्ये बराचवेळ हमरीतुमरी झाल्यानंतर यशवंत जाधव निघून गेले आणि पुन्हा अध्यक्षांच्या दालनात परतले. त्यानंतर दोघेही एकत्र जेवायला बसून जणू काही झालेच नाही, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.