गुरुदास कामत यांचे राजीनाम्याचे ‘स्मरणपत्र’

 Mumbai
गुरुदास कामत यांचे राजीनाम्याचे ‘स्मरणपत्र’
Mumbai  -  

सुमारे चार दशकांच्या कालावधीत पक्ष आणि संसदीय लोकशाहीत विविध पदे उपभोगणाऱ्या ज्येष्ठ काँग्रेस नेता आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस गुरुदास कामत यांनी पक्षाच्या सर्व 'जबाबदा-यांमधून मुक्ती'ची मागणी केली आहे. आपल्या या मागणीची बातमी खुद्द कामत यांनी समाजमाध्यमांमार्फत सार्वजनिक केली. माध्यमांना ही बातमी कळवताना त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे 'आपल्याला पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे', ही विनंती 3 फेब्रुवारीला केली होती. त्यानंतर 21 फेब्रुवारीला विनंतीचा पाठपुरावा केल्याची माहिती दिली आहे. आठवडाभरापूर्वी राहुल गांधी यांच्याशी प्रत्यक्ष भेटीतसुद्धा ही विनंती केल्याचा त्यांचा दावा आहे. हे ‘स्मरण’ करून देण्यासाठी मात्र त्यांनी गुजरातच्या प्रभारीपदावर अशोक गेहलोत यांची नेमणूक झाल्याची वेळ निवडली आहे. गेहलोत यांच्या झालेल्या नेमणुकीचे स्वागत करत असल्याचे कामत भासवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र ते या नेमणुकीवर नाराज आहेत. गेहलोत यांची गुजरात प्रभारीपदावर नेमणूक होण्यापूर्वी ही जबाबदारी गुरुदास कामत यांच्याकडे होती. नव्या रचनेनुसार गुरुदास कामत यांच्याकडे केवळ राजस्थानच्या प्रभारी पदाचा कार्यभार राहणार आहे. आपले पक्षातले महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याच्या भावनेतून कामत यांनी राजीनामा दिल्याची चर्चा केली जात आहे.

याआधीसुद्धा गुरुदास कामत यांनी पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आणत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना टीकेचे लक्ष्य केले होते. पक्षात आपल्यापेक्षा कमी योग्यता आणि कमी अनुभव असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान दिले जाते, आपल्याला आणि आपल्या समर्थकांना निर्णय प्रक्रियेतून सतत डावलले जाते… वगैरे मुद्द्यांवर कामत यांनी याआधी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली होती. याआधी कामत यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केला. राजीनाम्याच्या ‘स्मरणपत्रा’नंतर मात्र कामत यांचे मन वळवण्याचा प्रयत्न कुणी करेल, असे चित्र तूर्त तरी दिसत नाही. त्यामुळे यापुढे माध्यमांमधून गुरुदास कामत यांचा उल्लेख ‘माजी काँग्रेस नेता’ असा झाला, तरी आश्चर्य वाटायला नको.

Loading Comments