शिवसेनेच्या सात रणरागिणी सज्ज

 Mumbai
शिवसेनेच्या सात रणरागिणी सज्ज

मुंबई - मुंबई महापलिकेत येणारा काळ हा शिवसेना आणि भाजपामधील संघर्षाचा ठरणार आहे. कधी शिवसेनेकडून तर कधी भाजपाकडून आरोप प्रत्यारोप होत एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होणार आहे. भाजपाने यासाठी तशी रणनितीही आखली आहे. परंतु योगायोगाने शिवसेनेचीही बाजू भक्कम आहे. सभागृहातील भाजपाच्या गोंधळाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या सहा रणरागिणी कंबरेला पदर खोचत सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे या सहा रणरागिणींचा सामना भाजपावाले कसे करतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली असली तरी सत्तेची स्वप्न पूर्ण होऊ न शकलेला भाजपा आता पारदर्शकतेचा पहारेकरी म्हणून काम करणार आहे. त्यामुळे महापालिका सभागृहातील प्रत्येक विषयावर आता सर्वंकष चर्चा आणि वाद विवाद होणार आहेत. यामध्ये शिवसेना आणि भाजपाकडून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या चिखलफेक केली जाणार आहे. मागील महापालिकेच्या तुलनेत या वेळी शिवसेनेची बाजू सक्षम बनली आहे. यशवंत जाधव, मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर, श्रद्धा जाधव, राजूल पटेल, किशोरी पेडणेकर, शुभदा गुडेकर, शीतल म्हात्रे, विशाखा राऊत आदींसह अमेय घोले, समाधान सरवणकर, संजय घाडी, प्रल्हाद ठोंबरे, बाळा नर, रमेश कोरगावकर आदी अभ्यासू आणि चांगली बाजू मांडणारी नगरसेवकांची टीम शिवसेनेकडे आहे. परंतु यापेक्षा शिवसेनेच्या सात नगरसेविका असलेल्या रणरागिणींचे आव्हानच भाजपासमोर राहणार आहे.

एकेकाळी महापालिका आयुक्त करुण श्रीवास्तव यांच्यासह सपाच्या तत्कालीन नगरसेविका वकरुनिस्सा अन्सारी यांना धडा शिकवणाऱ्या शिवसेनेच्या रणरागिणींपैकी राजूल पटेल, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव या सभागृहात परतल्या आहेत. त्याला आक्रमक अशा शुभदा गुडेकर, सुवर्णा कारंजे आणि किशोरी पेडणेकर यांची साथ लाभणार आहे.

पराभूत झालेल्या तृष्णा विश्वासराव या नामनिर्देशित सदस्य म्हणून सभागृहात परतणार आहेत. त्यामुळे या सातही नगरसेविका असलेल्या रणरागिणींच्या रुद्रावतारापुढे भाजपा नगरसेवकांची कशी डाळ शिजते हे येणारा काळच सांगणार आहे.

विशाखा राऊत, राजुल पटेल, गुडेकर, कारंजे, श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर यांनीही भाजपाच्या नगरसेवकांना चोख प्रत्युत्तर देण्याची रणनिती तयार केली आहे. यापुढे या सात रणरागिणी भाजपाचे आव्हान कसे परतवून लावतात हेच पाहायचे आहे. 

विशेष म्हणजे या सात रणरागिणींना नव्या दमाच्या शितल म्हात्रे, संध्या दोषी, अंजली नाईक, सुजाता पाटेकर आदींची साथ मिळणार आहे. महापौर निवडीच्या दिवशी भाजपा आणि शिवसेनेकडून सुरू असलेल्या घोषणायुद्धात राजुल पटेल यांनीच पुढाकार घेतला होता.

भविष्यात सभागृहात राजुल पटेल यांच्यांसह यासर्व शिवसेनेच्या रणरागिणींचे आक्रमण पाहायला मिळणार आहे. भाजपाने यासाठी आपली रणनिती निश्चित केल्याचे समजते. त्यामुळे दोघांमधील संघर्षात शिवसेनेच्या या रणरागिणी कशा भाजपावाल्यांवर भारी पडतात, हेच पाहायचे आहे.

Loading Comments