Advertisement

कुणाचा पत्ता कापावा? महामंडळ नियुक्त्यांमध्ये शिवसेनेची आडकाठी


कुणाचा पत्ता कापावा? महामंडळ नियुक्त्यांमध्ये शिवसेनेची आडकाठी
SHARES

राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता येऊन साडेतीन वर्षे होत आली. तरीही पक्षात बंडाळी नको म्हणून जुन्या सरकारप्रमाणे फडणवीस सरकारनेही महामंडळांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्यांकडे कानाडोळा केला आहे. भाजपाकडे अध्यक्षपदाच्या उमेदवारांची यादी तयार असली तरी शिवसेनेला मात्र या नियुक्त्या नको असल्यानेच मुख्यमंत्र्यांना सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या महामंडळांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्यांचा प्रस्ताव बाजूला ठेवण्याच्या सूचना केल्याचं म्हटलं जात आहे.


यादी तयार असूनही

राज्यात देवेंद्र फडवणीस यांचं सरकार ऑक्टोबर २०१४ ला सत्तेवर आलं. परंतु साडेतीन वर्षे होत आली तरी सिध्दिविनायक न्यास समिती आणि शिर्डी संस्थान यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्या वगळल्या, तर कोणत्याही महामंडळाच्या अध्यक्षांची नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. महामंडळांच्या अध्यक्षपदे कुणाच्या वाट्याला किती येतील, याची वर्गवारी करून वाटपही करण्यात आलं आहे. शिवसेना आणि भाजपाच्या वाट्याची महामंडळे जवळपास निश्चित झालेली असतानाही केवळ पक्षांत अंतर्गत वाद आणि नाराजी निर्माण व्हायला नको म्हणून जाणीवपूर्वक या नियुक्त्या जाहीर केल्या जात नसल्याची बाब समोर आली आहे.



भाजपामध्ये नाराजी

म्हाडा प्राधिकरण, मुंबई म्हाडा मंडळ, कोकण म्हाडा मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळ, यासह राज्यातील अनेक महामंडळांच्या अध्यक्षपदी अद्यापही अध्यक्षांची वर्णी लावण्यात आलेली नाही. याबाबत भाजपाने आपली यादी तयार केली असून अद्यापही त्याबाबत कोणत्या प्रकारचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेतला जात नाही. साडेतीन वर्षे होत आली तरी आमच्याकडून अर्ज मागवूनही अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला जात नसल्यामुळे भाजपात तीव्र नाराजी पसरली आहे.

त्यामुळेच भाजपाने ही यादी तूर्तास बाजूला ठेवला असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, भाजपाची यादी तयार असली तरी शिवसेनेलाच ही या अध्यक्षपदाच्या नियुक्त्या करायच्या नसल्याने भाजपने यावरील निर्णय लांबणीवर टाकला असल्याचेही सुत्रांकडून समजते.


शिवसेनाच अनुत्सुक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महामंडळाच्या नियुक्त्यांबाबत खुद्द शिवसेना अनुत्सुक आहे. महामंडळांवर आपल्या समर्थकांची वर्णी लागावी म्हणून प्रत्येक नेता प्रयत्नशीर आहे. परंतु त्या सर्वांचा मान राखण्यात अपयश येत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महामंडळाच्या नियुक्त्यांच्या विषय बाजूला ठेवा, अशा सूचना केल्या आहे. या नियुक्त्या कराव्या लागल्या तर पक्षात अंतर्गत दुफळी माजेल आणि नाराजांना थोपवताना मोठी दमछाक होईल. त्यापेक्षा या महामंडळांची गरजच नाही, असं सांगून वाटपांमधील तिढा असल्याचं कारण पुढे करत यावरील वर्णी लावण्यास विलंब केल्याचं समजतं.


कुणाचा पत्ता कापावा?

भाजपाची याबाबतची यादीही तयार असली तरी शिवसेनेकडून अद्यापही यादी तयार करण्यात आलेली नाही. यादीत कुणाचे नाव टाकावं आणि कुणाचा पत्ता कापावा, यावरून या द्विधा मनस्थितीत शिवसेना अडकली आहे. त्यामुळेच महामंडळांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीत खुद्द शिवसेनेकडूनच खो घातला जात असून परिणामी याचाच फायदा घेऊन भाजपाही पक्षातील अंतर्गत नाराजीला घाबरुन या नियुक्त्या जेवढ्या लांबणीवर टाकता येईल, त्यासाठीही प्रयत्न करत आहे.


दोन्ही पक्षात एकमत

त्यामुळे शिवसेना आणि भाजपाला दोघांनाही महामंडळांवरील नियुक्त्या नको असल्याने अजुन पुढचे काही महिने तरी याची घोषणा केली जाणार नसल्याचंही सूत्रांकडून समजत आहे. काही मोजक्या लोकांना खूश करण्यासाठी शेकडो लोकांना नाराज करण्यापेक्षा या नियुक्त्या करण्याची गरजच नसल्याचं एकमत भाजपा आणि शिवसेनेत झालं असल्यामुळे महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा निर्णय होणारच नसल्याचेही दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडून खासगीत सांगण्यात येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा