Advertisement

शिवसेना भवनाशी पंगा घेणारा माणूस अद्याप जन्माला यायचाय- शिवसेना

शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल. असं म्हणत शिवसेनेने भाजपला खुलं आव्हान दिलं आहे.

शिवसेना भवनाशी पंगा घेणारा  माणूस अद्याप जन्माला यायचाय- शिवसेना
SHARES

माहीममधील भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात भाषण करताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली होती. त्याला शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेना भवनाशी पंगा घेणारा माणूस अद्याप जन्माला यायचाय. बाेला येताय अंगावर?, अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर! पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल.  असं म्हणत शिवसेनेने भाजपला खुलं आव्हान दिलं आहे. 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखातून भाजपवर (bjp) जहरी शब्दांत टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे. त्यांची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत त्यावरून हे स्पष्ट होते. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवसेना भवनाकडे ज्या कोणी वाकड्या नजरेने पाहिले ते यच्चयावत नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटारात वाहून गेले. ते पुन्हा कधीच कुणाला सापडू शकले नाहीत. ‘शिवसेना भवन फोडू’ अशी भाषा भाजपमधील काही बाटग्या टिनपाट मंडळींनी करावी व व्यासपीठावरील मराठी पुढाऱ्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय? 

शिवसेनेशी राजकीय मतभेद असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली. शिवसेना त्या आव्हानांच्या छाताडावर चढून उभी राहिली, पण त्या राजकीय विरोधकांनीही कधी शिवसेना भवन फोडण्या-तोडण्याची भाषा केली नाही. जे स्थान मराठी जनांच्या हृदयात हुतात्मा स्मारकाचे आहे तीच प्रेरणा व भावना शिवसेना भवनाच्या बाबतीत सर्वच पक्षांतील मराठी लोकांत आहे. शिवसेना आहे म्हणूनच मुंबईत मराठी माणूस ताठ मानेने व कण्याने उभा आहे हीच त्या सगळ्यांची भावना आहे. 

हेही वाचा- कोरोना निर्बंधांची आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का?- राज ठाकरे

महाराष्ट्राच्या (maharashtra) राजधानीत दादर मुक्कामी असलेल्या शिवसेना भवनाच्या दर्शनी भागी जसा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे तसा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचाही तेजस्वी पुतळा आहे. त्या भवनावर शिवरायांचा भगवा झेंडा डौलाने फडकत आहे. या भगव्या झेंड्यांचा पोटशूळ काही मंडळींना उठल्यामुळेच शिवसेना भवन फोडण्याची मस्तवाल भाषा त्यांनी केली. खरेतर या मंडळींची दखल घ्यावी व त्या टिनपाटांवर इथे काही लिहिण्या-बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही. पुन्हा हे जे कोणी फोडा- झोडा याची भाषा करीत आहेत त्यांची लायकी फक्त चिंधीचोर दलालांची आहे. शिवसेना भवनाच्या आसपास मैलभर परिघात उभे राहण्याची यांची कुवत नाही. तेजस्वी सूर्यावर थुंकून लक्ष वेधून घेण्यापलीकडे यांचे कर्तृत्व नाही. 

शिवसेना (shiv sena) भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच… असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहाणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर! पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना ‘खांदेकरी’ही घेऊन या. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना खांद्यावरच जावे लागते, हा इतिहासच आहे!, अशा शब्दांत भाजपवर हल्ला चढवण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा