Advertisement

भाजपविरोधाचा भक्कम चेहरा!

इतर राज्यांतील प्रादेशिक पक्षांचं कमकुवत नेतृत्व पाहता शिवसेना भाजपविरोधातील नवा चेहरा ठरू शकेल.

भाजपविरोधाचा भक्कम चेहरा!
SHARES

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन लवकरच एक वर्ष पूर्ण होत आहे. परस्परविरोधी विचारधारा असलेलं हे सरकार औटघटकेचं ठरेल, असा दावा विरोधकच नव्हे, तर राजकीय तज्ज्ञांकडून सातत्याने केला जात होता. परंतु या सगळ्यांना खोटं ठरवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार खडतर आव्हानांना तोंड देत आश्वासक वाटचाल करत आहे. एवढंच नव्हे, तर या निमित्ताने भाजविरोधी आघाडीतील प्रमुख चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा दिवसेंदिवस अधिकच ठळक होत चालली आहे.

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असतानाही केवळ सत्तावाटपाच्या खेचाताणीतून दोन्ही पक्षातील २५ वर्षांपासून असलेला घरोबा तुटला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी अभूतपूर्व आघाडी उदयाला आली. या दरम्यानच्या काळात वचनभंगाच्या नावाखाली शिवसेना-भाजप नेत्यांनी एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करत जुन्या सोयीच्या मैत्रीचे संबंधही पायदळी तुडवले. भविष्यातलं माहीत नाही, परंतु सध्याच्या घडीला भाजप-शिवसेना नेत्यांमधून विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. 

कडवट हिंदूत्व, आक्रमक प्रादेशिकवाद आणि काँग्रेसी विचारधारेचा तीव्र विरोध, अशी पार्श्वभूमी असताना तसंच काम करण्याची स्वत:ची वेगळी शैली असणारी शिवसेना राष्ट्रवादी, खासकरून काँग्रेससोबत कशी जुळवून घेईल, असे असंख्य प्रश्न राजकीय तज्ज्ञांना पडले होते. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विचारधारेचा जराही बागुलबुवा न करता, तडजोडीचा लवलेशही जाणवू न देता अत्यंत सहजरित्या दोन्ही पक्षांशी जुळवून घेतलं. (थोड्याफार कुरबुरी सोडल्यास) किमान आतापर्यंत तरी तसंच दिसतंय. नारिकता संशोधन कायदा (CAB) असो, शेती सुधारणा कायदा किंवा मंदिरं उघडण्याचा मुद्दा भाजपने प्रत्येक वेळी शिवसेनेला किंबहुना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी भाजपला तोंडावर आपटावं लागलं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करू पाहणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही उद्धव ठाकरेंनी शालजोडीतले लगावले. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तसंच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणं म्हणजे ‘secular’ असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘secularism’ आहे. तो आपल्याला मान्य नाही का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनाच पेचात टाकलं.

भाजपच्या प्रमुख नेत्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना तारतम्य बाळगलेलं (वेळेचं पारडं कधी कुणाच्या बाजूला झुकेल सांगता येत नाही) आहे. मात्र राज्याच्या राजकारणाशी संबंध जोडून तिरकस बाण मारण्याचा शिरस्ता त्यांनी कायम ठेवला आहे. दसरा मेळाव्यातील भाषणातून त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. 

शिवसेनेची दसरा मेळाव्याची ५३ वर्षांची परंपरा आहे. ३० ऑक्टोबर १९६६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला होता. तेव्हापासून दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण बनलं. परंतु कोराेना संकटामुळे यावर्षी पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कनजीकच्या सावरकर स्मारक सभागृहात पार पडला. यावेळेचा दसरा अनेक अंगांनी महत्त्वाचा ठरला. शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे देशभरातील राजकीय जाणकारांचं लक्ष होतं.

आपल्या ठाकरी बाण्याच्या जोरावर उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी करून हा दसरा मेळावा खास बनवला. खासकरून कोरोना, कोडमलेली अर्थव्यवस्था, हिंदुत्व, पाडापाडीचं राजकारण, बिहार निवडणूक आणि जीएसटीची रक्कम यावरून भाजप किंबहुना पंतप्रधानांवर अप्रत्यक्षरित्या केलेल्या शाब्दीक बाणांचे घाव भाजप नेत्यांच्या चांगलेच वर्मी बसले. त्याचे पडसाद आठवडाभर पडत होते. त्याआधी देखील काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील एका बैठकीत सहभागी होताना जीएसटीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधात उघड भूमिका घेत केंद्रातील सत्ताधाऱ्यांना घाबरायचं की लढायचं असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यावरून येत्या काळात शिवसेनेचं राजकारण हे प्रामुख्याने भाजपविरोधीच राहणार हे स्पष्ट दिसून येत आहे. सुशांत सिंह राजपूत, परप्रांतीय कामगार, बाॅलिवूड-ड्रग्ज रॅकेट या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला अडकवणाऱ्या भाजपविरोधात शिवसेनेने आपले उमेदवार बिहार निवडणुकीत उतरवले आहेत. बिहार निवडणुकीत शिवसेनेला किती यश मिळेल, हे आताच सांगता येत नसलं, तरी राज्याच्या बाहेर उडी घेत राष्ट्रीय राजकारणात (राम मंदिरात पूजा करण्यापलिकडे) आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न नक्कीच धाडसी म्हणावा लागेल. सध्याच्या राष्ट्रीय राजकारणातील काँग्रेस आणि डाव्यांची झालेली अवस्था पाहता आणि तृणमूल काँग्रेस, बसपा, सपा, राजद इ. प्रादेशिक पक्षांचं कमकुवत नेतृत्व पाहता (ममता बॅनर्जी सोडून) शिवसेना भाजपविरोधातील नवा चेहरा ठरू शकेल. अर्थातच येत्या काळातील राजकीय समीकरणं आणि बदललेली परिस्थिती यावर ते अवलंबून असेल.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा