Advertisement

कायदा-सुव्यवस्था राखा, मायानगरी आपोआप निर्माण होईल, शिवसेनेचा योगींना टोला

उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल, असा टोला शिवसेनेने मुंबईत आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे.

कायदा-सुव्यवस्था राखा, मायानगरी आपोआप निर्माण होईल, शिवसेनेचा योगींना टोला
SHARES

उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल, असा टोला शिवसेनेने मुंबईत आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे. 

सामनातील अग्रलेखातून योगी आदित्यनाथ यांचे कान टोचण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे. अग्रलेखातून म्हटलं आहे की, गेली कित्येक वर्षे लाखो उत्तर भारतीय मुंबईत काबाडकष्ट करून त्यांच्या मेहनतीची रोटी खात आहेत. आपले घरदार सोडून या मंडळींना मुंबईत का यावे लागले, याचा विचार योगी महाराजांनी करायला हवा. फिल्म सिटी हवीच, पण या बेरोजगारांच्या हातास काम मिळाल्याशिवाय योगींच्या संकल्पित मायानगरीत सोन्याचा धूर निघणार नाही. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असूनही ते फक्त लोकसंख्येनेच फुगले आहे. जातीयता, धर्मांधता यातून निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देशाला भेडसावीत आहे. उद्योग नाही म्हणून बेरोजगारी आहे. त्या सर्व श्रमिकांचे, बेरोजगारांचे लोंढे मुंबईसारख्या शहरांवर आदळत आहेत.

लखनौ, कानपूर, मेरठ अशा शहरांतील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करीअर करण्यासाठी वर्षानुवर्षे मुंबईतच (mumbai) येत आहेत. योगी या सगळय़ांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का? योगी जिद्दीला उतरले आहेत व त्यांनी फिल्म सिटीचे मनावर घेतले आहे. योगी महोदयांनी आता खुलासा केला आहे की, आम्ही काही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवीत आहोत. कोण उत्तम सुरक्षा आणि सुविधा देईल अशी ही स्पर्धा आहे. योगींचा हा विचार चांगलाच आहे. तुम्ही फिल्म सिटी खुशाल उभारा, पण त्यांच्या याच विधानात ‘फिल्म सिटी मुंबईतच का फोफावली, वाढली, बहरली आणि बाहेर का नाही?’ याचे उत्तर दडले आहे. शिवाय फिल्म सिटीच कशाला, मुंबईसारखे रोजगारनिर्मितीचे केंद्र आणि देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहरही योगींनी उभारायला काहीच हरकत नाही.

हेही वाचा- योगींनी मुंबईतच केली फिल्म सिटीची अधिकृत घोषणा 

फक्त फिल्म सिटीच्या भिंती उभारून, आत बगिचे, नद्या, इतर सेट उभारून काय होणार? मुंबईच्या वांद्रे, पाली हिल, जुहू, खार परिसरांत मायानगरी वसली आहे. मग येथील खरीखुरी मायानगरीही ते मिर्झापूरला हलवणार आहेत काय? उत्तर प्रदेशला सोन्यानेच मढवा व या सोन्याच्या विटा दिल्लीहून घेऊन या. आमची काहीच हरकत नाही, पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता? मुंबईला का ओरबाडता? मायानगरी तर दक्षिणेतील अनेक राज्यांतदेखील आहे. हैदराबादेत आहे. तामीळनाडू, आंध्रात आहे. योगी महाराज तेथेही जाऊन उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीचे कार्य पुढे नेणार आहेत काय? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे.

योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उत्तर प्रदेशचा विकास झालाच व त्यातून रोजगार निर्मिती घडली तर मुंबईवरील बराचसा ताण कमी होईल. त्यामुळे योगींच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नाही.  

(shiv sena criticises up cm yogi adityanath over film city in noida)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा